Android फोन वापरत असाल तर सावधान! खाली होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट; कारण..

New Malware Threat To Android Phone Users: अगदी सॅमसंगपासून ते ओप्पो, व्हिवोसारख्या कंपन्यांचे फोन अ‍ॅण्ड्रॉइड ऑप्रेटिंग सिस्टीमवर काम करतात. मात्र ही बातमी देशातील अ‍ॅण्ड्रॉइड युझर्सचं टेन्शन वाढवणारी आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 4, 2024, 01:30 PM IST
Android फोन वापरत असाल तर सावधान! खाली होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट; कारण.. title=
समोर आला नवीन अहवाल (प्रातिनिधिक फोटो)

New Malware Threat To Android Phone Users: स्मार्टफोनची जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठेपैकी एक म्हणजे भारत! भारतात कोट्यवधी अ‍ॅण्ड्रॉइड युझर्स आहेत. अगदी सॅमसंगपासून ते ओप्पो, व्हिवोसारख्या कंपन्यांचे फोन अ‍ॅण्ड्रॉइड ऑप्रेटिंग सिस्टीमवर काम करतात. मात्र ही बातमी देशातील अ‍ॅण्ड्रॉइड युझर्सचं टेन्शन वाढवणारी आहे. मोबाईल सुरक्षा तज्ज्ञांनी एका नवीन पद्धतीच्या मालवेअरसंदर्भात इशारा दिला आहे. या मालवेअरचं नाव अ‍ॅण्ड्रॉइड एक्सलोडर असं आहे.

युझर्ससाठी फार धोकादायक

अ‍ॅण्ड्रॉइड एक्सलोडर मालवेअर हा स्मार्टफोनमधील सर्व महत्त्वाची माहिती काढून घेण्यास समर्थ आहे. हा मालवेअर एसएमएसचाही अ‍ॅक्सेस घेतो. हा मालवेअर बॅकग्राऊण्डमध्ये काम करतो. समोर आलेल्या माहितीनुसार, हा मालवेअर स्मार्टफोन युझर्ससाठी फार धोकादायक ठरु शकतो. या मालवेअरसंदर्भातील अहवाल ब्लीपिंग कंप्युटर्सने 'मॅककॅफी'च्या हवाल्याने दिला आहे.

कसा करतो शिरकाव?

अ‍ॅण्ड्रॉइड एक्सलोडर मालवेअर फार सहजपणे मोबाईल डिव्हाइसवर हल्ला करतो. एक मालवेअरबाधित एसएमएस इंफेक्टेड वेबसाईटच्या युआरएलसहीत पाठवला जातो. हा मेसेज फोनमध्ये संक्षयास्पद अ‍ॅप्लिकेशन डाऊन करण्याचा मार्ग मोकळा करतो. मेसेजमधून आलेल्या लिंकवर क्लिक केल्यास मोबाईलमध्ये एपीके फाइल आपोआप इन्स्टॉल होते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेच हा मालवेअर मोबाईलमध्ये सक्रीय होतो. त्यामुळेच अनोखळी क्रमांकावरुन आलेल्या लिंकवर क्लिक करताना सावध राहणं गरजेचं आहे.

बँक अकाऊंट होईल खाली

एसएमएसच्या माध्यमातून आलेल्या लिंकवरुन साइडलोडिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन अन्य सोर्सच्या माध्यमातून अ‍ॅप इन्स्टॉल केलं जातं. विशेष म्हणजे मोबाईल वापरणाऱ्याला आपल्या फोनमध्ये हा सारा प्रकार सुरु आहे याची कल्पनाही नसते. हा मालवेअर केवळ एसएमएसचा अ‍ॅक्सेस घेत नाही तर मोबाईलमधील सर्व अ‍ॅप्समधील हलचालींवर लक्ष ठेवतो. या टूल्सचा वापर करुन हॅकर्स युझर्सचा लक्ष्य करु शकतात. अगदी बँकिंग अ‍ॅप्सचा डेटाही यामाध्यमातून ट्रक करता येतो. त्यामुळे या माध्यमातून हॅकर्स युझर्सचे बँक अकाऊंट काही क्षणात रिकामी करुन पैसे वळवून घेऊ शकतात.

धोका टाळण्यासाठी हे कराच

'मॅककॅफी'ने आधीच गुगलला या लिस्टेड थ्रेडबद्दल इशारा दिला आहे. यानंतर कंपनीने तातडीने मालवेअर हटवला होता. गुगल त्या अ‍ॅप्सवर नियंत्रण ठेऊ शकत नाही जे प्ले स्टोअरच्या बाहेर उपलब्ध आहेत. गुगलने दिलेल्या सल्लानुसार, युझर्सने अशा मालवेअरपासून सुरक्षित राहण्यासाठी प्ले प्रोटेक्शनचा पर्याय ऑन करायला हवा. अनेक धोक्यांपासून यामुळे मोबाईल सुरक्षित ठेवण्यास मदत होते. मालवेअर म्हणजे एका पद्धतीचा व्हायरच असतो. एकदा मालवेअर मोबाईलमधील सुरक्षा भेदून आता गेला की तो मोबाईलमधील खासगी माहिती हॅकर्सला पुरवतो.