ऑनलाईन तुम्ही चुकून दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले तर?

तुम्ही कधी चुकून अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत का? टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्यानंतर कुणालाही कुठूनही पैसे पाठवणे सहज शक्य झालं आहे.

Updated: Nov 26, 2018, 06:55 PM IST
ऑनलाईन तुम्ही चुकून दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले तर? title=

मुंबई : तुम्ही कधी चुकून अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत का? टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्यानंतर कुणालाही कुठूनही पैसे पाठवणे सहज शक्य झालं आहे. डिजिटल वॉलेट BHIM, UPI, गूगल पे, NEFT/RTGS असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण एखाद्या वेळेस चुकीच्या अकाऊंटला अथवा अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवले गेले तर काय करायचं? हे तुम्हाला माहित आहे का? तर हे जाणून घ्या...

जर चुकून एखाद्या अकाऊंट नंबरला तुम्ही पैसे पाठवले, तर ते पैसे तुमच्याच अकाऊंटला परत येऊ शकतात, किंवा त्या नंबरचं अकाऊंट असेल, तर दुसऱ्याच्या बँक अकाऊंटला हे पैसे जावू शकतात. दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे गेल्यानंतर, ते कसे परत मिळवायचे हा खरा प्रश्न आहे.

खालील गोष्टी नीट लक्षात ठेवा

जर चुकून दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे गेले, तर लगेच, तात्काळ तुमच्या बँक शाखेला याविषयी माहिती द्या, अथवा बँकेच्या कॉल सेंटरला कॉल करा आणि कळवा. अथवा ईमेल करा. यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शाखेच्या बँक मॅनेजरला भेटा. यात सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे, ती ध्यानात ठेवा. ज्या बँकेच्या अकाऊंट नंबरवर हे पैसे गेले आहेत, तिच बँक तुम्हाला पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत करू शकते.

आपल्या बँकेला चुकून झालेल्या बँक ट्रान्झॅक्शनविषयी सविस्तर माहिती द्या. ट्रान्झॅक्शनची तारीख, स्वत:चा अकाऊंट नंबर, ज्या अकाऊंटमध्ये चुकून पैसे गेले, त्या अकाऊंट नंबरची माहिती देखील द्या.

तक्रार दाखल करा

ज्या बँकच्या खात्यात तुमचे पैसे चुकून ट्रान्सफर झाले, त्या बँकमध्ये जाऊन तुम्ही तक्रार करा. बँक आपल्या ग्राहकाच्या परवानगी शिवाय कोणालाही पैसे पाठवू शकत नाही. तसेच बँक आपल्या ग्राहकांविषयी माहिती देखील देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तक्रार दाखल करण्याचा आग्रह केला पाहिजे. कारण चुकून जे पैसे, चुकून दुसऱ्यांच्या खात्यात गेले आहेत, ते पुन्हा तुमच्या खात्यात जमा झाले पाहिजेत.

कायदेशीर कारवाई

तुम्ही ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा केले आहेत, ती व्यक्ती जर समजदार असेल, तर तुमचे पैसे, परत मिळण्याची शक्यता आहे. पण जर त्याने पैसे परत करण्यास नकार दिला, तर तुम्ही कायदेशीर कारवाईचं पाऊल उचलू शकतात.

ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना काळजी घ्या

अकाऊंट नंबर चुकल्याची चूक तुम्हाला महागात पडू शकते. यामुळे तुम्ही जेव्हा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतात, तेव्हा अकाऊंट नंबर पुन्हा एकदा नीट, सावकाश तपासा. मोठी रक्कम ट्रान्सफर करण्याच्या नादात, अगोदर लहान रक्कम ट्रान्सफर करावी. यामुळे तुम्हाला कळेल, रक्कम योग्य त्या अकाऊंटला जात आहे किंवा नाही याची खात्री करता येईल.