iPhone च्या 'त्या' एका Notification मुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप! Apple कडून मोठा खुलासा

Opposition MP State Sponsored Attackers Claims: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांनी गंभीर आरोप करताना स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 31, 2023, 02:02 PM IST
iPhone च्या 'त्या' एका Notification मुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप! Apple कडून मोठा खुलासा title=
या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत

Opposition MP State Sponsored Attackers Claims: विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर हेरगिरीचा गंभीर आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, काँग्रेसचे खासदार शशि थरुर, पवन खेडा तसेच शिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदींबरोबरच आम आदमी पार्टीचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी आपले फोन हॅक करण्याचा प्रत्य होत असल्याचा आरोप केला आहे. आम्हाला स्वत: जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनीनेच आपल्याला यासंदर्भातील मेसेज नोटीफिकेशन पाठवल्याचं या खासदारांचं म्हणणं आहे. 

फोन हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

तृणमूलच्या नेत्या महुआ मोइत्रा, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, शशि थरुर आणि पवन खेडा यांनी फोन निर्मात्यांकडून आपल्याला फोन हॅकिंगसंदर्भात इशारा मिळाला आहे असं म्हटलं आहे. "स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्स तुमच्या फोनशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहेत," असा मेसेज आपल्याला अ‍ॅपलकडून आल्याचा खासदारांचा दावा आहे. कॅश फॉर क्वेश्चन म्हणजेच प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्या प्रकरणी आरोपी असलेल्या महुआ मोइत्रा यांनी ट्वीटरवरुन, "अ‍ॅपलकडून एक मेसेज आणि ई-मेल आला आहे. यामध्ये मला इशारा देण्यात आला आहे की माझा फोन आणि ई-मेल हॅक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे," असं म्हटलं आहे.

भाजपाचा पलटवार

भाजपा नेता नलिन कोहली यांनी, "महुआ मोइत्रा यांच्यावर फार गंभीर आरोप आहेत. संसदीय समितीसमोर गेल्यानंतर त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे त्या लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय गोष्टीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी कोणत्याही आधाराशिवाय असे दावे केले जात आहे. त्यांनी स्वत: हे हॅक करण्याचा प्रयत्न केला असावा आणि आता भारत सरकारवर आरोप केले असावेत," अशी शक्यताही व्यक्त केली आहे.

अमित मालवीय म्हणाले हा तांत्रिक गोंधळ

महुआ मोइत्रा यांनी केलेल्या आरोपांवरुन भाजपाचे नेते आणि भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी, "अ‍ॅपलकडून स्पष्टीकरणाचा वाट का पाहू नये. हा गोंधळ एक गंमत म्हणून संपणार. आक्रोश व्यक्त करण्यासाठी संधी शोधला जात आहे. दुसरीकडे मोबाईल कंपनी अ‍ॅपलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्गोरिदममधील गोंधळामुळे हा ईमेल आला आहे. यासंदर्भात कंपनी काही वेळाने स्पष्टीकरण देईल," असं म्हटलं आहे. 

अ‍ॅपलने स्पष्ट केली भूमिका

यासंदर्भात अ‍ॅपलने जारी केलेल्या निवेदनामध्ये, "अ‍ॅपलने कोणत्याही विशिष्ट स्टेट स्पॉन्सर्ड हल्लेखोरासंदर्भातील इशारा दिलेला नाही," असं म्हटलं आहे. स्टेट स्पॉन्सर्ड हल्लेखोर हे फार हुशार आणि आर्थिक पाठबळ असलेले असतात. ते स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी फार वेळ घेतात. अशाप्रकारचा धोका समजून घेण्यासाठी आवश्यक असलेले इंटेलिजन्स सिग्नल्स हे फारच सदोष आणि अपूर्ण असतात. असं होऊ शकतं की, काही अ‍ॅपल नोटिफिकेशनच्या माध्यमातून खोटे इशारे दिले जातात किंवा काही हल्ले कळतही नाहीत. मात्र आता आलेले नोटिफिकेशन नेमके कशामुळे आले ही माहिती आम्ही देऊ शकत नाही. कारण अशी माहिती दिली तर भविष्यात त्याचा फायदा या स्टेट स्पॉन्सर्ड हल्लेखोरांनाच होईल, असं अ‍ॅपलने म्हटलं आहे.