iPhone Ban in Russia: "...नाहीतर iPhone तुमच्या मुलांना खेळायला द्या"; रशियाने सरकारी कर्मचाऱ्यांना दिली Deadline

Russian Officials To Get Rid Of iPhones: रशियामधील सरकारने यासंदर्भातील थेट निर्देशच एका बैठकीमध्ये जारी केले असून सर्व सरकारी अधिकाऱ्यांना आयफोनचा वापर बंद करण्यासंदर्भातील डेडलाइनही दिली आहे. या आदेशाची सध्या देशभरामध्ये चर्चा आहे.

Updated: Mar 23, 2023, 04:03 PM IST
iPhone Ban in Russia: "...नाहीतर iPhone तुमच्या मुलांना खेळायला द्या"; रशियाने सरकारी कर्मचाऱ्यांना दिली Deadline title=
iPhone In China

Russian Government Order On iPhone: मागील अनेक दशकांपासून अमेरिका आणि रशियामध्ये वैचारिक वाद सुरु आहे. जागतिक राजकारणावर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टींसंदर्भात हे दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं अनेकदा पहायला मिळालं आहे. अनेकदा हे दोन्ही देश आंतरराष्ट्रीय मंचावर एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. 21 व्या शतकामध्ये दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी अत्याधुनिक माध्यमांचा आणि खास करुन तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहेत. अनेक देश एकमेकांवर निर्बंधही लादताना दिसतात. याचे ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर गालवान संघर्षनंतर भारताने चिनी अॅप्लिकेशनवर केलेला डिजीटल स्ट्राइक. असाच काहीसा डिजीटल संघर्ष सध्या रशिया आणि अमेरिकेमध्ये सुरु आहे. 

काय म्हटलं आहे या आदेशामध्ये?

रशियामधील व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) सरकारने (Russian Government) एक फर्मानच जारी केलं आहे. या नव्या आदेशानुसार रशियामधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापर्यंत आपल्या आयफोनचा वापर बंद करावा लागणार आहे. आयफोनच्या माध्यमातून हेरगिरी आणि हॅकिंगचा धोका असल्याची भिती रशियन सरकारने व्यक्त केली असल्याचं वृत्त कॉमेर्सांत (Kommersant) या वृत्तपत्राने दिलं आहे. 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात मार्च महिन्यामद्ये रशियाचे पहिले कर्मचारी उपप्रमुख सेर्गेई किरीयेन्को (Sergei Kiriyenko) यांनी एक बैठक घेतली. या बैठकीमध्येच हा मुद्दा मांडण्यात आला.  सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर आपले आयफोन बदलून घेण्याचे आणि इतर कंपन्यांचे फोन वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी 1 एप्रिलपर्यंतची डेडलाइन देण्यात आली आहे. 1 एप्रिलपर्यंत आयफोनचा वापर बंद करा किंवा ते तुमच्या मुलांना खेळण्यासाठी द्या, असं या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. 

का देण्यात आले हे आदेश?

रशियन सरकारला आयफोनच्या माध्यमातून हेरगिरी होण्याची भिती वाटत आहे. आयफोनमधून सरकारी कामासंदर्भातील माहिती चोरीला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. "इतर स्मार्टफोनच्या तुलनेत पाश्चिमात्य तज्ज्ञ आयफोनमधून सहज हेरगिरी करु शकतात," असं सरकारचं म्हणणं आहे. 'द रजिस्टर'ने दिलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला ही बंदी केवळ राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात काम करणाऱ्यांसाठी, देशाचं धोरण ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी, सरकारी समित्यांवरील प्रमुखांसाठी, सार्वजनिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाटी आणि संवाद क्षेत्रातील तज्ज्ञांसाठीच लागू केली जाणार होती. मात्र आता सरसकट सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपर्यंत आपल्या आयफोनचा काय तो सोक्षमोक्ष लावा असं थेटपणे सांगण्यात आलं आहे.

आयफोनऐवजी काय वापरणार?

आयफोनऐवजी काय वापरावे यासंदर्भातही रशियन सरकारने सल्ला दिला आहे. सरकारी अधिकारी अॅण्ड्रॉइडबरोबरच चिनी ऑप्रेटिंग सिस्टीमवर चालणारे फोन वापरावेत किंवा अगदी रशियामधील अॅरोरा ऑप्रेटिंग सिस्टीमवरील फोनही वापरले तरी चालतील असं सरकारने सांगितलं आहे. काही सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या आयफोनच्या मोबदल्यात सरकार स्वत: नवीन फोन देण्याच्या तयारीत असल्याचेही समजते.

रशियामध्ये आयफोन बंद

मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये अॅपल कंपनीने रशियामध्ये आयफोनची विक्री बंद केली होती. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय कंपनीने घेतला होता. रशियामध्ये आयफोन 14 लॉन्चच करण्यात आला नाही. या बाजारपेठेत पुन्हा उतरण्याचा कंपनीचा इरादा नाही. गुगुल प्ले स्टोरही रशियामध्ये उपलब्ध नसून याला पर्याय म्हणून नॅशस्टोरसारख्या माध्यमातून अॅप्लिकेशन डाऊनलोड केली जातात. सामान्यपणे जगभरामध्ये आयफोन हे सर्वात सुरक्षित स्मार्टफोन मानले जातात. मात्र रशियन सरकारने जारी केलेला आदेश हा पाश्चिमात्य देशांशी असलेल्या मतभेदामधून दिल्याची चर्चा आहे.