बदलापुरात धावतेय 'माणुसकीची सायकल'

या सायकल स्टॅण्डवर मोफत सायकल्स उपलब्ध आहेत

Updated: May 30, 2019, 10:48 AM IST
बदलापुरात धावतेय 'माणुसकीची सायकल' title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : बदलापुरातल्या रस्त्यांवर सध्या माणुसकीची सायकल धावतेय. दहिवलीमध्ये राहणाऱ्या समीर देशमुखला ही कल्पना सुचली आणि त्याने ती प्रत्यक्षात आणली.  दहिवली गावातल्या चौकात एक सायकल स्टॅन्ड उभारण्यात आला आहे. या सायकल स्टॅण्डवर मोफत सायकल्स उपलब्ध आहेत. गावात किंवा दूर आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी ही सायकल मोफत वापरायची आणि पुन्हा इथे आणून ठेवायची.  

लोकांच्या गरजा आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसंच पर्यावरणाच्या दृष्टीने चालू केलेला उपक्रम आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आदिवासी लोकांना जाण्या-येण्यासाठी, दळणवळणाची सोय व्हावी हा या मागचा उद्देश असल्याचं समीर देशमुख यांनी सांगितलं.

लहान मुलांना शाळेत जाण्याकरता या याचा फायदा व्हावा हाही या मागचा मुख्य हेतू आहे. 

या उपक्रमासाठी जुन्या सायकल्स देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या सगळ्या सायकल्स दुरुस्त करण्यात आल्या. काही नवीन घेण्यात आल्या. मोफत सायकलींची ही भन्नाट कल्पना आहे. माणुसकीच्या या सायकलीने अवघड प्रवास सोप्पा करुन टाकला आहे.