याला म्हणतात योगायोग... दारुबंदी आहे तिथेच उलटला बियरचा ट्रक; समृद्धी महामार्गावर बाटल्या गोळा करण्यासाठी गर्दी

समृद्धी महामार्गावर बियरची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. बॉटल गोळा करण्यासाठी नागरिकांची धावाधाव झाली. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात बियरचा ट्रक उलटल्याने तळीरामांना लॉटरी लागल्यासारखेच वाटले. 

वनिता कांबळे | Updated: May 1, 2023, 07:15 PM IST
याला म्हणतात योगायोग... दारुबंदी आहे तिथेच उलटला बियरचा ट्रक; समृद्धी महामार्गावर बाटल्या गोळा करण्यासाठी गर्दी title=

Samruddhi Mahamarg : शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (shirdi nagpur samruddhi mahamarg) अपघातांची मालिका सुरुच आहे. समृद्धी महामार्गावरील वर्धा येथे विचित्र अपघात घडला आहे. वर्ध्याजवळ  बियरची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला.  बियरचा ट्रक पलटी झाल्याने गावकऱ्यांनी बियरच्या बॉटल गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली होती.  विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात बियरचा ट्रक उलटल्याने तळीरामांना लॉटरी लागल्यासारखेच वाटले. 

सोमवारी पहाटेच्या सुमारास वर्ध्यात महाकाळ शिवारात हा अपघात घडला. समृद्धी महामार्गावर निलगाय आडवी आल्याने ट्रक पलटी झाल्याचे समजते. यावेळी ट्रकमधल्या बियरच्या बाटल्यांचा रस्त्याशेजारीच सडा पडला. मिळेल तेवढ्या बियरच्या बॉटल गोळा करण्यासाठी नागरिकांची चांगलीच धावाधाव झाली. जेवढ्या हाती येतील तेवढया बॉटल घेत अनेकांनी पळ काढला.  दारूबंदी जिल्ह्यात ट्रक पलटी झाल्याने परिसरातील नागरिकांची चांगलीच चांदी झाली.

नागपुरच्या वाडी येथील निशा ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक औरंगाबाद येथील एमआयडीसीतून बियरचे बॉक्स घेऊन नागपुरच्या दिशेने जात होता. दरम्यान सदर ट्रकच्या समोर समृद्धी महामार्गावरील महाकाळ शिवारात अचानक मोठी निलगाय आडवी आली. यावेळी उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथील ट्रक चालकाने निलगायीला वाचविण्यासाठी जोरात ब्रेक मारला. मात्र, यात ट्रक रस्त्याच्या शेजारील खोलगट भागात पलटी झाला. 

या अपघातात 9 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बियरचा ट्रक उलटल्याची बातमी काहीच क्षणात वाऱ्यासारखी पसरली. बियरच्या बॉटल गोळा करण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी गेली. जास्तीत जास्त बॉटल गोळा करण्याचा प्रयत्न नागिकांनी केला. 

शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्ग (shirdi nagpur samruddhi mahamarg) प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर केवळ 5 तासांच पार करता येत आहे. 11 डिसेंबर 2022 पासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गावरुन प्रवास करत आहे. साई भक्तांसाठी या मार्गावर एसटी महामंडळातर्फे विशेष बस सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. या बस सेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यातच वाढते अपघात ही चिंतेची बाब बनली आहे. अपगात रोखण्यासाठी विशेष योजना उपाययोजना देखील करण्यात येत आहेत.