8व्या मजल्यावरून पडणाऱ्या मुलीला वाचवताना बापाचाही शेवट, अखेरच्या श्वासापर्यंत केले प्रयत्न

Pune News Today: लेकीसाठी बापाचे प्रेम हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. लेकीला वाचवण्याच्या प्रय़त्नात बापानेही प्राण गमावले आहेत.   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 29, 2023, 05:18 PM IST
8व्या मजल्यावरून पडणाऱ्या मुलीला वाचवताना बापाचाही शेवट, अखेरच्या श्वासापर्यंत केले प्रयत्न title=
pune news today father and daughter fell down from 8th floor in pune

Pune News Today: पुण्यातून एक हृदय हेलावणारा प्रसंग समोर आला आहे. 8व्या मजल्यावरुन पडून बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडिलांचे वय 33 वर्ष इतके आहे तर मुलीचे वय अवघे अडीच वर्षे इतके आहे. रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. देहूयेथील इंद्रायणी वाटिका येथील एका सोसायटीत हा प्रकार घडला आहे. (Pune Crime News Today)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मजली इमारतीतील ८व्या मजल्यावर हे कुटुंब राहत होते. रविवारी बाबा लेकीसोबत गॅलरीत होता. तर, अडिच वर्षांची मुलगी कठड्यावर बसली होती. त्याचवेळी तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळत होती. लेकीचा जीव धोक्यात असतानाच वडिलांनी तिला वाचवण्यासाठी जीवाचे रान केले. कोणत्याही परिस्थितीत त्याला आपली मुलगी सुखरुप हवी होती. मात्र, नियतीलाच हे मान्य नव्हते मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलही खाली कोसळले. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मुलीची आई किचनमध्ये काम करत होती. 

देहू रोड पोलिस दलातील वरिष्ठ निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अडिच वर्षांची तृषा लागड जेव्हा एका भिंतीवर बसली होती तेव्हा तिचा तोल गेला. लेकीचा तोल जाताच वडिलांनी तिला सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते सुद्धा तिच्यासोबतच खाली कोसळले. अधिकाऱ्यांनी म्हटल्यानुसार, सोसायटीच्या ग्राउंड फ्लोरवरुन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. यात दोघंही आठव्या मजल्यावरुन खाली कोसळताना दिसत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश लागड असं मृत व्यक्तीचे नाव आहे. रमेश भारतीय लष्करात क्लर्क पदावर कार्यरत आहेत. मागील दीड वर्षांपासून ते इंद्रायणी वाटिका सोसायटीत राहतात. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी रमेश त्यांच्या मुलीसोबत रविवारी सोसायटीच्या पार्कमध्ये खेळत होते. त्यानंतर दोघंही आठव्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या घरी गेले. 

सोसायटीतील रहिवाशांना दुपारी 12.30 वाजता जोरदार आवाज ऐकला. आवाज ऐकून बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिलं की रमेश लागड त्यांच्या मुलीसह खाली बेशुद्धावस्थेत पडले होते. रहिवाशांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सूर्यवंशी यांनी पुढे म्हटलं आहे की, या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणात अधिक तपास सुरू आहे.