खूप खाल्ल्यानंतर आळसावल्यासारखे का वाटते ?

पोटभर जेवल्यानंतर झोप येते ?

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 23, 2017, 08:48 PM IST
खूप खाल्ल्यानंतर आळसावल्यासारखे का वाटते ? title=

मुंबई : पोटभर जेवल्यानंतर झोप येते ? नक्कीच. अगदी सगळ्यांनाच येते. ती का येते ? तर जेव्हा आपण खूप खातो किंवा जेवतो तेव्हा त्या अन्नाचे विघटन करायला शरीराला अधिक ऊर्जा लागते आणि अतिरिक्त अन्न साठवावे लागल्यामुळे महत्त्वाच्या अवयवांवर ताण येतो. त्याचबरोबर शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात त्यामुळे मानसिक प्रक्रीयेत बदल होतात. त्यामुळे तुम्हाला झोप येते व आळसावल्यासारखे वाटते. आयुर्वेदीक डॉक्टर Luke Coutinho, (M.D. in Alternative Medicine-Integrative & Lifestyle Medicine) यांनी अति खाल्याने शरीरात काय बदल होतात, हे सांगितले.

इन्सुलिनची पातळी वाढते: तुम्ही जे अन्न खाता त्याचे विघटन होऊन ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. स्वादुपिंडातून स्त्रवणारे इन्सुलिन ग्लुकोजचा शरीरभर प्रसार करण्यास मदत करतात. जेव्हा रक्तात अतिरिक्त ग्लुकोज असते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. तेव्हा ऊर्जेचा स्फोट होतो. ग्लुकोजचा शरीरभर प्रसार करण्यासाठी स्वादुपिंडातून अधिक इन्सुलिन स्त्रवले जाते. त्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते. म्हणून काही वेळानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यावर शरीरातील ऊर्जा देखील कमी होते. रक्तातील कमी झालेल्या साखरेच्या प्रमाणामुळे आपल्याला थकल्यासारखे वाटते आणि झोप येते.

झोपेचे हार्मोन्स स्त्रवतात: ग्लुकोजचा शरीरभर प्रसार करण्यासाठी अतिरिक्त इन्सुलिन स्त्रवते तेव्हा दोन गोष्टी घडतात. पहिली- tryptophan हे स्लीप हार्मोन स्त्रवते जे मेंदूत जाते आणि serotonin व melatonin यांचे मेटॅबॉलिझम होते. दुसरी- melatonin हे देखील स्लीप हार्मोन असून ते स्त्रवते. त्यामुळे अधिक आळसावल्यासारखे व थकल्यासारखे वाटते. परंतु, serotonin मुळे तुम्ही एकदम थकत नाही. परंतु, फ्रेश वाटण्यासाठी थोडा वेळ झोपण्याची इच्छा होते.  tryptophan आणि melatonin या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला आळसावल्यासारखे वाटते आणि झोप येते. म्हणून, जेवणानंतर काम करण्याची अधिक इच्छा न होण्यामागचे हे एक कारण आहे.

यासाठी काय करावे ?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिरिक्त खाऊ, जेऊ नका. जेव्हा तुम्ही अधिक खाता तेव्हा तुमची पचनसंस्था अन्नपचनासाठी शरीराच्या पूर्ण ऊर्जेच्या साधारणपणे ६०-७५% ऊर्जा खर्च करते. म्हणून अतिरिक्त अन्न घेतल्याने तुमच्या शरीराच्या इतर भागातील ऊर्जा पोटाच्या दिशेने जाते. त्यामुळे तुम्हाला थकल्यासारखे आणि आळसावल्यासारखे वाटते. जर जेवल्यानंतर नेहमी तुम्हाला झोप येत असेल तर याचा अर्थ तुम्ही अधिक प्रमाणात कार्ब्सचे सेवन करत आहात. आहारात संतुलन राखण्यासाठी तुम्ही न्यूट्रीशियनिस्टची मदत घेऊ शकता. सावकाश खा त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण लगेच वाढणार नाही. भूक लागल्यावर वेळेत आणि योग्य प्रमाणात खा. त्यामुळे अन्नाचे विघटन करण्यासाठी शरीराला अतिरिक्त ऊर्जा खर्च करण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर तुमच्या स्वादुपिंडातून गरजेइतकेच इन्सुलिन स्त्रवले जाईल. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित राहील.