रोहिंग्यांचा नरसंहाराचा आरोप... स्यू की आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर

म्यानमारमध्ये अल्पसंख्य असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांवर लष्करानं अनन्वित अत्याचार केल्याचे आरोप होत आहेत

Updated: Dec 21, 2019, 11:24 PM IST
रोहिंग्यांचा नरसंहाराचा आरोप... स्यू की आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर title=

बर्मा, म्यानमार : आन सान स्यू की... शांततेचा नोबेल पुरस्कार... जगभरातल्या गांधीवादींच्या एक आदर्श नेत्या... म्यानमारमध्ये लोकशाही अस्तित्वात यावी म्हणून त्यांनी आयुष्यभर झुंज दिली... तरुण वयातला बराचसा काळ त्यांनी लष्कराच्या नजरकैदेमध्ये व्यतीत केला. २०१५ साली सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या 'नॅशनल लिग ऑफ डेमेक्रेसी पक्षा'नं तब्बल ८६ टक्के जागा जिंकल्या. त्यांचे पती आणि मुलं विदेशी नागरिक असल्यामुळे त्या अध्यक्ष होऊ शकत नव्हत्या. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या समकक्ष असलेलं स्टेट काऊंसिलर हे पद त्यांच्यासाठी निर्माण केलं गेलं. मात्र जगभरातल्या लाखो गांधीवाद्यांच्या हिरो असलेल्या स्यू की खरोखर हिरो आहेत की व्हिलन? असा प्रश्न आता विचारला जातोय.

त्याचं कारण म्हणजे रोहिग्यांच्या नरसंहाराचा आरोप... म्यानमारमध्ये अल्पसंख्य असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांवर लष्करानं अनन्वित अत्याचार केल्याचे आरोप होत आहेत. राखीन प्रांतातल्या रोहिंग्या वस्त्यांवर हल्ले चढवून त्यांचं निर्वंशीकरणाचा प्रयत्न केल्याची टीका होतेय. 

लाखो नागरिकांना बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमध्ये पळून जावं लागलंय. एकट्या बांगलादेशच्या कॉक्स बाजार जिल्ह्यात तब्बल ७ लाख २३ हजार रोहिंग्या निर्वासित असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटलंय. त्यांना परत घ्यावं, यासाठी जगभरातून दबाव असताना म्यानमारचा ठाम नकार आहे.

म्यानमारच्या या धोरणावर जगभरातून टीका होतेय. गामबिया या लहानशा आफ्रिकन देशानं म्यानमारला आणि स्यू की यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचलंय. गेल्या आठवड्यात 'द हेग' इथं झालेल्या सुनावणीमध्ये स्यू की यांनी सर्व आरोप फेटाळले. तसंच आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अधिकारही नाकारले.

मात्र, शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धाचा अनुयायी असलेला देश आणि त्या देशाच्या गांधीवादी नेत्या आन सान स्यू की... खरोखर हिरो आहेत की व्हिलन? याचं उत्तर जगाला हवं आहे.