उठा उठा दिवाळी आली... या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली 10 दिवसांची दिवाळी सुट्टी

याला म्हणतात कंपनी, कर्मचाऱ्यांनी कुटुंबासोबत फिरण्यसाठी 10 दिवसांची दिवाळी सुट्टी

Updated: Oct 10, 2022, 08:38 PM IST
उठा उठा दिवाळी आली... या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली 10 दिवसांची दिवाळी सुट्टी title=
संग्रहित फोटो

Diwali 2022 : दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. तिमिरातून तेजाकडे नेणारा हा सण. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असंही म्हटलं जातं. संपूर्ण देशात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्या कुटुंबाबरोबर हा सण साजरा करता यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण नोकरी म्हणा किंवा कामामुळे प्रत्येकालच ते शक्य होतं असं नाही. नोकरदार वर्गाची हीच समस्या लक्षात घेऊन एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क 10 दिवसांची दिवाळी सुट्टी (10 Days Diwali Vacation) देण्याची घोषणा केली आहे. 'काम बंद करा, कुटुंबासह आनंद साजरा करा', असं कंपनने जाहीर केलं आहे. 

कंपनीने यासाठी घेतला निर्णय
अमेरिकेतल्या WeWork नावाच्या कंपनीने आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांसाठी (Indian Employee) दिवाळीचं (Diwali) हे मोठं बक्षिस दिलं आहे. सणासुदीच्या दिवसात कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबासोबत आनंद साजरा करता यावा यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. 

कुटुंबासोबत आनंद साजरा करा 
या 10 दिवसांच्या दिवाळी सुट्टीबद्दल बोलताना कंपनीने सांगितले की, कर्मचार्‍यांना व्यस्त दैनंदिन कामातून विश्रांती देणे आणि सणासुदीच्या काळात त्यांच्या प्रियजनांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची संधी देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. वी-वर्कच्या मते, एम्प्लॉई फर्स्ट (Employee First) या संकल्पनेखाली अशी पॉलिसी 2021 मध्ये पहिल्यांदा आणण्यात आली होती.

2022 वर्ष कंपनीसाठी महत्त्वाचं
कंपनीच्या पीपल अँड कल्चर ऑफिसर प्रिती शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2022 हे वर्ष कंपनीसाठी खूपच महत्त्वाचं ठरलं आहे. यंदाच्या वर्षात कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली असून कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे हे परिणाम असल्याचं प्रिती शेट्टी यांनी म्हटलं आहे. 10 दिवसांची दिवाळी सुट्टी ही संकल्पना कर्मचाऱ्यांविषयी आभार मानण्याची पद्धत असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. 

Meesho नेही केली घोषणा
ऑनलाईन कंपनी मीशोनेही आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचं बम्पर बक्षिस दिलं आहे. मीशोने 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे 11 दिवसांचा 'रिसेट अँड रिचार्ज' ब्रेक देण्याची घोषणा केली आहे.