दुष्काळात तेरावा...! 'या' देशाच्या निर्णयामुळे जगभरात खाद्यतेलाचे दर आणखी भडकणार

रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम जगाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम जाणवत असताना, इंडोनेशिया देशाने खाद्य तेलाच्या निर्यातीवर अचानक बंदी घातली आहे. 

Updated: Apr 26, 2022, 10:43 AM IST
दुष्काळात तेरावा...! 'या' देशाच्या निर्णयामुळे जगभरात खाद्यतेलाचे दर आणखी भडकणार title=

मुंबई : रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम जगाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम जाणवत असताना, इंडोनेशिया देशाने खाद्य तेलाच्या निर्यातीवर अचानक बंदी घातली आहे. त्यामुळे जगात खाद्य तेलाची टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. भारततही पाम तेलाची 60 टक्के आयात इंडोनेशियातून होते. 

जागतिक बाजारपेठेत खाद्य तेल निर्यातीत इंडोनेशियाचा वाटा खूप मोठा आहे. वनस्पती तेलाच्या जागतिक निर्यातीमध्ये एकट्या इंडोनेशियाचा वाटा एक तृतीयांश इतका आहे. त्यामुळे इंडोनेशियाने निर्यात बंदीच्या घेतलेल्या निर्णयाचा फटका खाद्यतेल आयात करणाऱ्या देशांना बसणार आहे.

मोठ्या प्रमाणावर खाद्य तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारत आघाडीवर आहे. इंडोनेशियाच्या निर्यात बंदीमुळे भारतात खाद्य तेलाचे भाव आणखी भडकू शकतात. भारतात सध्या 220-240 रुपये प्रति लिटर आहे.

जगात खाद्यतेलाच्या टंचाईची कारणं

युक्रेन सुर्यफूल तेलाचे उत्पादन करणारा मोठा देश आहे. रशिया युक्रेन  युद्धामुळे ही पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये दुष्काळामुळे सोयाबीनचं उत्पादन घटलं आहे. पामतेलाच्या टंचाईमुळे सोयाबीन, सुर्यफूल आणि मोहरीसारखे महाग तेल ग्राहकांना खरेदी करावे लागत आहे. 

इंडोनेशियाच्या निर्यात बंदीचा भारतातील खाद्य तेलाच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. भारतात खाद्य तेलाचे दर वाढू शकतात. त्यामुळे भारतातील खाद्यतेल उद्योग संघटना सॉल्वेंट एक्स्ट्रॅक्टर्स ऑफ इंडियाने भारत सरकारने इंडोनेशिया सरकारशी चर्चा करावी असे म्हटले आहे.