कॅनडात भारतीय वंशाच्या दांपत्याला आणि मुलीला जिवंत जाळून केलं ठार? मृतदेहांची राख, पोलिसांना वेगळाच संशय

कॅनडात भारतीय वंशाच्या दांपत्याचा मुलीसह आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख पटली असून त्यांची नावं राजीव (51), शिल्पा (47) आणि महेक (16) अशी आहेत.   

शिवराज यादव | Updated: Mar 16, 2024, 03:43 PM IST
कॅनडात भारतीय वंशाच्या दांपत्याला आणि मुलीला जिवंत जाळून केलं ठार? मृतदेहांची राख, पोलिसांना वेगळाच संशय title=

कॅनडात भारतीय वंशाच्या कुटुंबाचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ओंतिरयो प्रांतातील घराला संशयास्पदरित्या आग लागल्यानंतर त्यात होरपळून ते ठार झाले आहेत. 7 मार्चला ही आग लागली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान आगीत मृतदेह पूर्णपणे जळाल्याने पोलिसांना त्यांची ओळख पटवणं कठीण जात होतं. मृतांची ओळख पटली असून त्यांची नावं राजीव (51), शिल्पा (47) आणि महेक (16) अशी आहेत. 

सुरुवातीला घऱात आग लागल्याने दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत होतं. पण पोलिसांनी प्राथमिक तपास सुरु केला असता त्यांना ही आग जाणुनबुजून लावण्यात आल्याचा संशय आला आहे. कॉन्स्टेबल टेरिनने या आगीचं वर्णन संशयास्पद असं केलं आहे. आमच्या हाती लागलेल्या पुराव्यांवरुन आम्ही आगीच्या कारणाचा शोध घेत आहोत असंही त्याने सांगितलं आहे. 

"आम्हाला हत्येचा संशय असून संबंधित विभागाकडे चौकशी करत आहोत. ओंटारियो फायर मार्शलने ही आग अपघाती नव्हती असं सांगितल असल्याने आमचा संशय बळावला आहे ," श्री असं यंग यांनी सीटीव्ही या वृत्तवाहिनीला सांगितले.

साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, घराला आग लागण्यापूर्वी एक मोठा स्फोट ऐकू आला होता. ज्यामुळे आसपास राहणारे अनेकजण गोंधळले होते. कुटुंबाचे शेजारी केनेथ युसफ यांनी घर पूर्णपणे आगीत जळून गेलेलं पाहिल्यानंरचे दुःखदायक क्षण सांगितले.

युसुफ यांनी सांगितलं की, गेल्या आठवड्यात कुटुंबातील एका सदस्याने त्यांना आगीची माहिती दिली होती. "जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा घराला आग लागली होती. ते फार वाईट होतं. काही तासांतच सर्व काही जमिनीवर कोसळले," असं युसुफ यांनी सीटीव्हीला सांगितले.

आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझल्यानंतर त्यांनी तपासाला सुरुवात केली. यावेळी त्यांना आगीत जळालेल्यांच्या मृतदेहाचे काही अवशेष सापडले होते. पण त्यावेळी पोलिसांनी नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला आहे याची कल्पना नव्हती. पोलिसांनी सांगितलं आहे की, "घटनास्थळाची पाहणी करताना तपासकर्त्यांना दुर्दैवाने उद्ध्वस्त झालेल्या घरात मानवी अवशेष सापडले".

तपास केला असता पोलिसांना हे मृतदेह राजीव, शिल्पा आणि महेक यांचे असल्याची माहिती मिळाली. आग लागली तेव्हा हे सर्वजण घऱात होते. राजीव यांनी टोरंटो पोलिसांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलं असून त्यांचा कार्यकाळ 2016 मध्ये संपला होता. तसंच महेश एक चांगली फूटबॉल खेळाडू होती. तिच्यात उत्तर अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती मिळवून देण्याची क्षमता होती असं प्रशिक्षकाने सांगितलं आहे. 

पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. जर कोणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी पुढे यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. "घराला लागलेल्या आगीच्या सभोवतालची परिस्थिती तपासाचा केंद्रबिंदू आहे. जर तुमच्याकडे काही माहिती किंवा व्हिडिओ फुटेज (डॅशकॅम किंवा अन्यथा) असल्यास संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे," असं पोलिसांनी सांगितलं.