इस्रायलच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने इस्लामिक देशाने भारतीय डॉक्टरला दिली 'ही' शिक्षा

Israel Hamas War Action Against Indian Origin Doctor: मागील 16 दिवसांपासून सुरु असलेल्या हमास आणि इस्रायलदरम्यानच्या वादामुळे जगभरामध्ये 2 गट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जगभरातील देश 2 गटांमध्येे विभागले गेले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 23, 2023, 10:51 AM IST
इस्रायलच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने इस्लामिक देशाने भारतीय डॉक्टरला दिली 'ही' शिक्षा title=
या डॉक्टरने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट

Israel Hamas War Action Against Indian Origin Doctor: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धादरम्यान इस्लामिक देश असलेल्या बहरीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या देशातील भारतीय वंशाच्या डॉक्टरने इस्रायलच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. बहरीनमधील रॉयल हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरने सोशल मीडियावर पॅलेस्टाईन विरोधात पोस्ट केली होती. त्यामुळे या व्यक्तीला नोकरीवरुन काढून टाकण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला.

काय नाव आहे या डॉक्टरचं?

पॅलेस्टाईनला समर्थन करणाऱ्या भारतीय वंशाच्या डॉक्टरचं नाव सुनील राव असं आहे. सुनील राव यांनी आपल्या एक्स (पूर्वीचं ट्वीटर) हॅण्डलवरुन एक पोस्ट केली होती. या पोस्टला फ्लॅग करत एका व्यक्तीने बहरीनमधील अधिकाऱ्यांकडे राव यांच्या या पोस्टविरोधात तक्रार केली. यानंतर बहरीनमधील या रुग्णालयाच्या प्रशासनाने एक्सवरुन एका पोस्टच्या माध्यमातून डॉ. सुनील राव यांना इस्रायलचं समर्थन केल्याप्रकरणी कामावरुन काढून टाकत असल्याची घोषणा केली. 

रुग्णालयाने कारवाई करताना काय म्हटलं?

"आम्हाला असं दिसून आलं आहे की इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ म्हणून काम करत असलेल्या डॉ. सुनील राव यांनी सोशल मीडियावर एक ट्वीट केलं असून ही पोस्ट आपल्या समाजासाठी अपमानकारक आहे. त्यांची पोस्ट आणि विचारसरणी ही वैयक्तिक आहे. हे रुग्णालयाचे मत नाही. हे आमच्या आचारसंहितेचं उल्लंघन आहे. आम्ही गरजेची सर्व कारवाई केली आहे. त्यांना सेवेमधून तात्काळ प्रभावाने काढून टाकण्यात आलं आहे," असं रुग्णालयाने म्हटलं आहे.

कारवाईनंतर डॉक्टारांनी घेतला मोठा निर्णय

रुग्णालयाने कारवाई केल्यानंतर डॉ. सुनील राव यांनी आपलं विधान हे असंवेदनशील होतं असं मान्य केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक माफीनामाही पोस्ट केला. आपल्या माफीनाम्यामध्ये डॉ. राव यांनी, "मी इथं केलेल्या एका पोस्टसाठी माफी मागू इच्छितो. सध्या घडलेली घटना पाहता माझं विधान असंवेदनशील होतं. एक डॉक्टर म्हणून माझ्यासाठी सर्वांचा जीव महत्त्वाचा आहे. मी हा देश, येथील लोक आणि येथील धर्माचा फार सन्मान करतो कारण मी इथं मागील 10 वर्षांपासून राहतो," असं म्हटलं आहे. 

भारतामध्ये या डॉक्टरने घेतलंय शिक्षण अन् 20 वर्षांचा आहे अनुभव

'लाइव्ह मिंट'ने दिलेल्या वृत्तानुसार, बहरीनमधील रॉयल हॉस्पिटलच्या वेबसाईटवरुन डॉ. सुनील राव यांची प्रोफाइळ हटवण्यात आली आहे. डॉ. सुनील राव यांच्या बायोनुसार त्यांनी आंध्र मेडिकल कॉलेज, विशाखारपट्टनम आणि कर्नाटकमधील मंगळुरुमधील कस्तूरबा मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. डॉ. सुनील राव यांच्याकडे एकूण 20 वर्षांचा अनुभव आहे.