Israel Hamas war : भयंकर! मासिक पाळी रोखण्यासाठी पॅलेस्टाईनच्या महिला करतायत 'हे' जीवघेणं काम

Israel Hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असणारं युद्ध आता इतक्या वाईट वळणावर पोहोचलं आहे की नागरिकांचं अस्तित्वंच धोक्यात येताना दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: Nov 1, 2023, 09:39 AM IST
Israel Hamas war : भयंकर! मासिक पाळी रोखण्यासाठी पॅलेस्टाईनच्या महिला करतायत 'हे' जीवघेणं काम  title=
Israel Hamas war palestinian women taking pills to stop periods

Israel Hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असणाऱ्या युद्धानं आता संपूर्ण जगावरच संकट ओढावताना दिसत आहे. सध्या गाझा पट्टीवर सुरु असणाऱ्या संघर्षानं संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. तर, या मानवनिर्मित संकटामध्ये नागरिकांच्या अस्तित्वावरच आता सावट येताना दिसत आहे. दर दिवसागणिक गाझा पट्टीतील वातावरण बिघडत असून पॅलेस्टिनी नागरिकांचे आतोनात हाल होताना दिसत आहेत. 

पॅलेस्टिनी महिलांचं जीवघेणं पाऊल... 

पॅलेस्टिनी नागरिकांवर सध्या ओढावलेलं संकट शब्दांतच मांडणंही शक्य नसून, येथील महिलांनी आता एक जीवघेणं पाऊल उचलल्याचं स्पष्ट होत आहे. असंख्य पॅलेस्टिनी महिला मासिक पाळी लांबवणाऱ्या गोळ्यांचं सेवन करत असून, पाळी टाळताना दिसत आहेत. अस्वच्छतेचा दानव सर्वत्र असून, स्वच्छतेच्या मूलभूत गरजा भागवणंही इथं कठीण होताना दिसत आहे. त्यातच इस्रायलकडून सातत्यानं होणारे हल्ले संकटांमध्ये आणखी भर टाकताना दिसत आहेत. ज्यामुळं पॅलेस्टिनी महिलांनी हे पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे. 

हेसुद्धा वाचा : VIRAL VIDEO : सॉलिड गुप्तहेर बनला होता श्वान, मेंढरांनी ओळखताच पचका झाला!

 

एकाच ठिकाणी दाटीवाटीनं असणारी नागरिकांची गर्दी, पाण्याचा तुटवडा, मासिक पाळीसाठी लागणारे सॅनिटरी पॅड, टॅम्पून यांसारख्या गोष्टींचा तुटवडा आणि अभाव या साख्यामुळं येथील पॅलेस्टिनी महिला वारंवार पाळी लांबवण्याची औषधं घेताना दिसत आहेत. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना, शारीरिक अशक्तपणा आणि तत्सम गोष्टी टाळण्यासाठी म्हणून येथील महिला शरीराच्या दृष्टीनं हानिकारक असणाऱ्या या मार्गाचा नाईलाजानं अवलंब करताना दिसत आहेत. 

औषधांचे दुष्परिणाम होत असूनही... 

तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्या म्हणण्यानुसार या गोळ्या किंवा औषधांनी मासिक पाळी लांबत असली तरीही त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणामही अनेक आहेत. या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

पाळी लांबवण्याच्या या औषधांमुळं योनीमार्गातून होणारा अनियमित रक्तस्त्राव, मळमळ, मासिक पाळीच्या नियमिततेत मोठे बदल, सततचा थकवा, विचित्र वाटणं, पोटदुखी, वजन वाढणं या आणि अशा अनेक समस्या उदभवू शकतात. पण, येथील महिलांना आता कोणताही पर्याय हाताशी उरला नसल्यामुळं स्वत:लाच संकटात टाकण्याची एकमेव वाट निवडावी लागत आहे. 

पोटात खड्डा पाडणारं वास्तव... 

गाझापट्टीतील तेल अव शहरावर जेव्हा इस्रायलनं बॉम्ब हल्ले केले त्यावेळी येथील सलमा नाक प्रत्यक्षदर्शी महिलेसह इतरही महिलांनी नाईलाजानं आपल्या राहत्या घरांतून पळ काढला. किंबहुना ऑक्टोबर महिन्यात मासिक पाळी आली असता सलमा जेव्हा औषधांच्या दुकानात गेली तेव्हा तिला तिथं सॅनिटरी पॅडऐवजी पाळी थांबवण्याच्या गोळ्या घे असं सांगण्यात आलं आणि तिच्या पोटात खड्डा पडला होता.