भारताच्या अनन्वित छळातून काश्मीरींना सोडवा, पाकिस्तानचा कांगावा

पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी सालाबाद प्रमाणे काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपाची मागणी केलीय. 

Updated: Sep 22, 2017, 11:04 AM IST
भारताच्या अनन्वित छळातून काश्मीरींना सोडवा, पाकिस्तानचा कांगावा title=

न्यूयॉर्क : पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी सालाबाद प्रमाणे काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपाची मागणी केलीय. 

गुरुवारी संध्याकाळी अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (UNGA) भाषण केलं. भारत काश्मीरी जनतेवर अनन्वित अत्याचार करत आहे, असा बाष्कळ आरोप अब्बासी यांनी केला.

या शिवाय पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांना भारताची फूस असल्याचा आरोपही अब्बासींनी केलाय. नियंत्रण रेषेपलिकडे भारतानं कुठलीही लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तान त्याला योग्य प्रत्युत्तर देईल, असा इशाराही अब्बासींनी दिला.

एक स्पेशल आंतरराष्ट्रीय चौकशी समिती काश्मीरमध्ये पाठवण्यात यावी आणि तिथं होणाऱ्या मानवाधिकारांचं उल्लंघन आणि वातावरणाची चौकशी व्हावी... दोषींना शिक्षा व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संस्थेच्या उच्चाधिकाऱ्यांकडे केलीय.

जानेवारी महिन्यापासून भारतानं ६०० वेळा आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा दावाही पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलाय. जवळपास २०० देशांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना अब्बासींच्या भाषणात १७ वेळा काश्मीर आणि १४ वेळा भारताचा उल्लेख होता हे विशेष... 

दरम्यान, संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा राग आळवणाऱ्या पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर दिलंय. आता पाकिस्तान टेररिस्तान झाल्याचा हल्लाबोल भारताने संयुक्त राष्ट्राच्या आम सभेत केलाय. काश्मीरचा मुद्दा उचलून पाकिस्तान कांगावा करत असल्याचे भारताने म्हटलंय. पाकिस्तानात दहशतवाद्यांचा अड्डा बनल्याचेही भारताने म्हटलंय. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रतिनिधी इनाम गंभीर यांनी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा बुरखा फाडलाय.