कैरोमध्ये मोदी-मोदीचा नारा, 'शोले'तल्या गाण्याने स्वागत... 26 वर्षांनंतर भारतीय पीएमचा इजिप्त दौरा

इजिप्तचे राष्ट्रपती अल-सिसी यांच्या निमंत्रणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर जात आहे. विमानतळावर पीएम मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.

राजीव कासले | Updated: Jun 24, 2023, 09:48 PM IST
कैरोमध्ये मोदी-मोदीचा नारा, 'शोले'तल्या गाण्याने स्वागत... 26 वर्षांनंतर भारतीय पीएमचा इजिप्त दौरा title=

PM Modi in Egypt : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर आज दोन दिवसांच्या इजिप्त (Egypt) दौऱ्यासाठी रवाना झाले. इजिप्तची राजधानी कैरोमध्ये (Cairo) पीएम मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं. विमानतळावर पीएम मोदी यांचं स्वागत करण्यासाठी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल एल सिसी (Abdel Fattah El-Sisi) स्वत: उपस्थित होते. पारंपारिक वाद्यांनी पीएम मोदींना विमानतळावर 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. 

इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल एल सिसी यावर्षी प्रजासत्ताक सोहळ्यात प्रमुख पाहुणेही होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना इजिप्त दौऱ्याचं निमंत्रण दिलं होतं. 1997 नंतर म्हणजे तब्बल 26 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान इजिप्तला भेट देणार आहेत. द्विपक्षीय व्यापारासंदर्भात मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. 'मला विश्वास आहे की या भेटीमुळे भारताचे इजिप्तसोबतचे संबंध दृढ होतील. मी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी चर्चा करण्यास आणि इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे' अशी प्रतिक्रिया पीएम मोदी यांनी व्यक्त केली.

'शोले'तल्या गाण्याने स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी कैरोतल्या हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर इथल्या भारतीय वंशाच्या लोकांनी तिरंगा फडकावत मोदी-मोदी आणि वंदे मातरमचा नारा देत त्यांचं स्वागत केलं. यातल्या एका महिलेने ब्लॉकबस्टर चित्रपट 'शोले'तलं  'ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे' हे गाणं गात पीएम मोदींचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदी यांनी कौतुकाने हे गाणं ऐकलं आणि महिलेच्या गाण्याला दादही दिली. विशेष म्हणजे या महिलेला हिंदी भाषा फारशी येत नाही आणि ती कधी भारतातही आलेली नाही. या महिलेचा पेहराव आणि हिंदी गाणं ऐकून पीएम मोदी यांनी 'तू इजिप्तची कन्या आहेस की भारताची हे कोणाला कळणार नाही' असं कौतुक केलं.

रविवारी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
पंतप्रधान मोदी रविवारी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर ते इजिप्तच्या मंत्रिमंडळाचीही भेट घेणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तचे ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अब्देल-करीम अल्लम यांची भेट घेतील आणि नंतर इजिप्तच्या प्रमुख विचारवंतांशी चर्चा करतील.

पंतप्रधान त्यांचे समकक्ष मॅडबौली यांच्या नेतृत्वाखालील इजिप्शियन मंत्रिमंडळाच्या भारतीय युनिटसोबत गोलमेज चर्चेला उपस्थित राहतील. यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तचे ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अब्देल-करीम अल्लम यांची भेट घेतील आणि नंतर इजिप्तच्या प्रमुख विचारवंतांशी चर्चा करतील. याशिवाय पीएम मोदी इजिप्त दौऱ्यात भारतीय वंशाच्या लोकांना भेटणार आहेत. तसंच एक हजार वर्ष जुन्या अल हकिम या शिया मशिदीलाही भेट देतील.