'...तर गावकऱ्यांना मारुन टाका'; ड्रीम प्रोजेक्टच्या जमीन अधिग्रहणासाठी सरकारी आदेश

Told To Kill To Clear Land: सामान्यपणे कोणत्याही सरकारी प्रकल्पासाठी सबुरीने आणि सहमतीने जमीन अधिग्रहण केलं जातं. मात्र चक्क तीन गावं संपूर्णपणे उद्धवस्त करण्यात आली.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 10, 2024, 01:46 PM IST
'...तर गावकऱ्यांना मारुन टाका'; ड्रीम प्रोजेक्टच्या जमीन अधिग्रहणासाठी सरकारी आदेश title=
अधिकाऱ्याचे केला धक्कादायक खुलासा (सौनिकांचा फोटो प्रातिनिधिक, नकाशा गुगल मॅपवरुन साभार)

Told To Kill To Clear Land: सौदी अरेबिया सरकारने एक अजब आदेश जारी केला आहे. निओम नावाच्या स्मार्ट शहराच्या उभारणीसाठी जमीन संपादित करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यांविरोधात शक्तीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सौदीचे राजकुमार मोहम्मद बीन सलमान यांनी या निओम शहराची योजना आखली आहे. माजी गुप्तचर अधिकारी असलेल्या कर्लन राबी अॅलेन्झी यांनी बीसीसीला दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी या प्रकल्पामधील 'द लाइन' हा टप्पा पूर्ण करण्यासाठी जमीन द्यावी असे निर्देश देण्यात आले होते. या नियोजित प्रकल्पासाठीची जागा रिकामी करुन ती अधिग्रहण करण्याच्या आदेशाविरोधात आवाज उठवणाऱ्या एका व्यक्तीला गोळ्या झाडून ठार करण्यात आल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केल्याचं बीबीसीने म्हटलं आहे. जमीन देण्यास नकार देणाऱ्या गावकऱ्यांना मारुन टाका असे सरकारी आदेश होते, असा या अधिकाऱ्याचा दावा आहे. निओम शहर हे सौदी अरेबियाच्या 2030 च्या सौदी व्हर्जनचा भाग आहे. या दाव्यासंदर्भात सौदी सरकार आणि निओम व्यवस्थापनाने कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.

'द लाइन' नेमकं आहे का?

'द लाइन' हा 'कारमुक्त' म्हणजेच एकही चारचाकी गाडी नसणारा भाग असेल असं नियोजन आहे. या भागाची रुंदी 200 मीटर आणि लांबी 170 किलोमीटर असेल. आतापर्यंत यापैकी केवळ 2.4 किलोमीटरचं बांधकाम झालं आहे. हा प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.

3 गावं पूर्णपणे नष्ट केली

सरकारी आकडेवारीनुसार 6000 हून अधिक लोकांना या प्रकल्पाच्या बांधकामासाठी स्थलांतरित करण्यात आलं आहे. मात्र युनायटेड किंग्डममधील मानवी हक्कासाठी काम करण्याऱ्या एएलक्यूएसटी या संघटनेनं हा अकडा जास्त असेल असं म्हटलं आहे. बीसीसीने सॅटलाइटच्या माध्यमातून घेतलेल्या फोटोंच्या आधारे अलखुर्याब, शारमा आणि गायल ही तीन गावं पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचा दावा केला आहे. हुवेताईत वंशाचे नागरिक या गावांमधील मूळ रहिवाशी होते. मात्र त्यांचा उल्लेख सरकारने विरोध करणारा गट असा केल्याचा दावा कर्लन राबी अॅलेन्झी यांनी केला आहे.

...म्हणून इतक्या क्रूरपणे वागले

"निओम हा मोहम्मद बीन सलमान यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच ते हुवेताईत यांच्याबरोबर इतक्या क्रूरपणे वागले," असं कर्लन राबी अॅलेन्झी यांनी म्हटलं आहे. सध्या कर्लन राबी अॅलेन्झी यांना त्यांच्या जीवाला धोका वाटत असून त्यांनी सौदी अरेबिया सोडून युनायटेड किंग्डमचा आश्रय घेतला आहे.

कसं असणार आहे हे शहर?

मोहम्मद बीन सलमान यांच्या संकल्पनेतून साकरली जाणारी निओम ही फ्युचर सीटी हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हे शहर अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरापेक्षा 33 पट मोठी असणार आहे. या शहराचा एकूण एरिया 26,500 स्वेअर किलोमीटर इतका असणार आहे. लाल समुद्राला लागून असलेला समुद्रकिनारा आणि अकाबच्या आखातादरम्यान हे शहर वसवलं जाणार आहे. निओम हे वाव ग्रीक आणि अरेबिक शब्द एकत्र करुन तयार करण्यात आलं आहे. ग्रीक शब्द निओ आणि अरेबिकमधील 'भविष्य' या अर्थाचा शब्द एकत्र करुन हा शब्द तयार केला आहे.

10 मोठे महाल बांधण्याचे दिलेले आदेश

'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने 2022 मध्ये दिलेल्या वृत्तानुसार मोहम्मद बीन सलमान यांनी फुटबॉलच्या मैदानाहूनही मोठ्या आकाराचे 10 राजवाडे बांधण्याचा आदेश दिलेला. या प्रकल्पामधील प्रत्येक घर हे 400 मिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत असेल असं या वृत्तपत्राने अंदाज व्यक्त करताना म्हटलेलं.