अफगाणिस्तानात उद्या तालिबान सरकारची घोषणा? असं असेल तालिबानी सरकार

शुक्रवारच्या नमाजाचा मुहूर्त साधत तालिबानकडून नव्या सरकारची घोषणा होण्याची शक्यता

Updated: Sep 2, 2021, 10:36 PM IST
अफगाणिस्तानात उद्या तालिबान सरकारची घोषणा? असं असेल तालिबानी सरकार title=

काबुल : अफगाणिस्तानात (Afghanistan) उद्या तालिबानी (Taliban) सरकारची घोषणा होण्याची शक्यता आहे. शुक्रवारचा नमाज अदा झाल्यानंतर घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुल्ला अखुंदजादा हे देशाचे सर्वोच्च नेता होऊ शकतात. पंतप्रधानपदी अब्दुल गनी बरादर किंवा मुल्ला ओमरचा मुलगा मुल्ला याकूबची यांची निवड होऊ शकते.

तालिबाननं अफागाणिस्तानवर विजय मिळवून आता दोन आठवडे  पूर्ण झाले आहेत. अमेरिकन सैन्यानेही अफगाणिस्तानमधून माघार घेतली आहे. त्यामुळे शुक्रवारच्या नमाजाचा मुहूर्त साधत तालिबानकडून नव्या सरकारची आणि त्याच्या संभाव्य स्वरुपाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मुल्ला अखुंदजादा सर्वोच्च नेते

नवीन सरकारमध्ये 60 वर्षीय मुल्ला अखुंदजादा तालिबान सरकारचे सर्वोच्च नेते असतील. ही व्यवस्था इराणमधील नेतृत्वाच्या धर्तीवर केली जाईल जिथे सर्वोच्च नेत्याला देशातील सर्वात मोठा राजकीय आणि धार्मिक अधिकार आहे. त्यांचे पद हे राष्ट्रपतींपेक्षा वर आहे आणि ते लष्कर, सरकार आणि न्यायव्यवस्थेच्या प्रमुखांची नेमणूक करतात. देशाच्या राजकीय, धार्मिक आणि लष्करी बाबींमध्ये सर्वोच्च नेत्याचा निर्णय अंतिम असतो. 

मुल्ला अखुंदजादा हे तालिबानचे सर्वात मोठे धार्मिक नेते आहेत आणि ते गेल्या 15 वर्षांपासून बलुचिस्तान प्रांताच्या कचलक भागातील एका मशिदीत काम करत आहेत. नवीन सरकार अंतर्गत राज्यपाल प्रांतांचे प्रमुख असतील आणि 'जिल्हा राज्यपाल' त्यांच्या जिल्ह्याचे प्रभारी असतील.

तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे सदस्य अनमुल्ला समनगनी यांनी सांगितलं की, नवीन सरकार स्थापन करण्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, तसंच मंत्रिमंडळाबाबत आवश्यक निर्णयही घेण्यात आले आहेत. आम्ही ज्या इस्लामिक सरकारची घोषणा करणार आहोत, ते लोकांसाठी एक उदाहरण ठरेल.