पाकिस्तानविरोधात निदर्शने करणाऱ्यांवर तालिबानकडून गोळीबार, Video आला समोर

तालिबान लढाऊंनी काबूलमधील प्रेसिडेंशियल पॅलेसजवळ गोळीबार केला.

Updated: Sep 7, 2021, 04:25 PM IST
पाकिस्तानविरोधात निदर्शने करणाऱ्यांवर तालिबानकडून गोळीबार, Video आला समोर title=

काबुल : तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानात आपल्या क्रूरतेचे प्रदर्शन केले आहे. काबूलमध्ये पाकिस्तानविरोधी रॅलीदरम्यान जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी तालिबानकडून गोळीबार करण्यात आला आहे. मंगळवारी काबूलच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानविरोधी निदर्शने होत होती.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, तालिबान लढाऊंनी काबूलमधील प्रेसिडेंशियल पॅलेसजवळ गोळीबार केला. येथे मोठ्या संख्येने आंदोलक मोर्चा काढत होते. प्रेसिडेंट पॅलेस जवळ काबुल सेरेना हॉटेल आहे, जेथे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI चे प्रमुख गेल्या एक आठवड्यापासून मुक्काम करत आहेत.

मंगळवारच्या निदर्शनाचे कव्हरेज करणारे पत्रकार आणि कॅमेरामन यांनाही तालिबानने अटक केली आहे.

अफगाणिस्तानमध्ये गेल्या एक -दोन दिवसांपासून पाकिस्तानविरोधात सातत्याने निदर्शने सुरू होती. अफगाण नागरिक पाकिस्तानकडून पंजशीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आहेत.

पाकिस्तानचा पंजशीरमध्ये ड्रोन हल्ला

पंजशीरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाने उत्तर आघाडीच्या स्थानांवर ड्रोन हल्ले केले, ज्याचा फायदा तालिबानला झाला. यानंतर अफगाणिस्तानच्या नागरिकांचा पाकिस्तानप्रती असलेला संताप उफाळून आला आहे. काबूल, मजार-ए-शरीफमध्ये निदर्शने सुरू झाली, विशेष गोष्ट अशी आहे की, यामध्ये महिलांचा समावेश अधिक आहे.

केवळ अफगाणिस्तानच नाही तर वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या अफगाण नागरिकांनी व्हाईट हाऊससमोर पाकिस्तानविरोधात निदर्शने केली. लोकांनी पाकिस्तानवर बंदी घालण्याची मागणी केली.

विशेष म्हणजे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख फैज हमीद गेल्या काही दिवसांपासून काबूलमध्ये आहेत. ते काबूलमध्ये तालिबान-हक्कानी नेटवर्कचे समन्वय साधण्यासाठी आणि सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आले आहे, ज्याला स्थानिक लोक विरोध करत आहेत.