Ashadhi Ekadashi : लाखोंच्या संख्येनं सध्या वारकरी विविध संतमंडळींच्या पालख्यांच्या सोबतीनं पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहेत. एक एक टप्पा ओलांडत ही मंडळी विठ्ठलभेटीच्या आणखी नजीक पोहोचताना दिसत आहेत. त्यांच्या या प्रवासाचा शेवटचा टप्पा अतिशय मनमोहक आणि प्रचंड उत्साहानं भारावलेला असेल. याच खास दिवशी जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल- रखुमाईचं दर्शन घेता यावं यासाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 


ऐतिहासिक निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात येणाऱ्या असंख्य भाविकांना आता सहजपणे विठ्ठलाचं दर्शन घेण्यात येणार आहे. थोडक्यात आषाढी एकादशीच्या दिवशी आता 24 तासही विठूरायाचं मुखदर्शन घेता येणार आहे... आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होते. मात्र यावेळी मुखदर्शन बंद असतं. यंदाच्या वर्षी मात्र पहिल्यांदाच हा मुखदर्शनाचा प्रयोग राबवला जाणार आहे.


पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असून यंदाच्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असतानाही भाविक विठूरायाचं मुखदर्शन घेऊ शकणार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच असा एखादा निर्णय घेण्यात आल्यामुळं सध्या सर्वत स्तरांतून या निर्णयाचं स्वागत होत आहे. 


हेसुद्धा वाचा : आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी नाही! पंढरपूरमधील मुस्लिमांचा मोठा निर्णय


 


दरवर्षी पंढरपुरच्या विठ्ठल - रखुमाई मंदिरात साधारण पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास शासकिय महापूजेची सुरुवात होऊन ही पूजा पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु असते. दरम्यानच्या काळात दर्शन रांगांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात येतात. पण, यंदा मात्र ही महापूजा सुरु असतानाही भाविकांना विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे. 


कुठवर पोहोचल्या संतांच्या पालख्या...? 


सध्याच्या घडीला संतमंडळीच्या पालख्या पंढरपुराच्या नजीक येताना दिसत आहे. सध्या संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण माळशिरसच्या पुरंदवडे इथं होणार आहे. त्यानंतर माऊलींची पालखी आज माळशिरस मुक्कामी विसावेल. 


तिथे तुकोबारायांच्या पादुकांसह पालखी आणि अनेक दिंड्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. शनिवारी सकाळीच त्यांच्या पादुकांचं निरास्थान पार पडलं. त्यानंतर टँकरच्या पाण्य़ाने पादुकांना स्नान घालून त्यांचं विधीवत पूजन करण्यात आलं. यावेळी वारकऱ्यांसह दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दरम्यान, आता पालख्यांमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांचा आकडा दर दिवसागणिक वाढत असून, त्या पंढरपुरात पोहोचेपर्यंत ही संख्या मोठ्या फरकानं वाढलेली असेल, जिथं वैष्णवांचा मेळा सर्वांनाच पाहता येईल.