आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी नाही! पंढरपूरमधील मुस्लिमांचा मोठा निर्णय

Ashadi Ekadashi 2023: मंदिर समितीचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव, मौलानांची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्येच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

Updated: Jun 22, 2023, 04:54 PM IST
आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईदची कुर्बानी नाही! पंढरपूरमधील मुस्लिमांचा मोठा निर्णय title=
बैठकीनंतर एकमताने घेण्यात आला निर्णय

- विशाल करोळे, झी मिडीया, छत्रपती संभाजीनगर

Ashadi Ekadashi 2023: आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून पंढरपूरच्या (Pandharpur Wari) दिशेने रवाना झाल्या आहेत. यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईदचे सण 29 जून या एकाच दिवशी येत आहेत. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील पंढरपूरमध्ये बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी साजरी केली जाणार नाही असं निश्चित करण्यात आलं आहे. आषाढीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे पंढरपूरमध्ये 30 तारखेला बकरी ईद साजरी केली जाणार आहे. आषाढीचा दिवशी येणारी बकरी ईद साजरी न करता दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 तारखेला कुर्बानी घेतली जाणार आहे.

सर्वच स्तरातून कौतुक

छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी बकरी ईदच्या दिवशी येणारी पवित्र कुर्बानी ही आषाढीनंतर पुढील दोन दिवसांत घ्यावी अशी विनंती मुस्लिम धर्मगुरूंना केली होती. त्यानुसार पोलिसांनी मंदिर ट्रस्टच्या वतीने मुस्लिम बांधव आणि मुस्लिम धर्मगुरु यांची बैठक घेतली या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील पंढरपूरमध्ये यंदा आषाढीच्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाणार नसून 30 तारखेला साजरी केली जाणार आहे. एकीकडे राज्यामध्ये मागील काही महिन्यांपासून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडल्या असतानाच पंढरपूरमध्ये मात्र असा सलोखा दाखवला जात असल्याबद्दल सर्वच स्तरामधून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. पोलिसांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आल्याने पोलिसांवरही कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 

सर्वांनाच असं करण्याचं आवाहन

पंढरपूरचे माजी सरपंच शेख अख्तर यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. "आमच्या गावामध्ये 29 तारखेला आषाढी एकादशीचा उत्सव आहे. त्याच दिवशी बकरी ईद आहे. त्यामुळेच गावातील सर्व मौलाना, तसेच जबाबदार लोकांनी असा निर्णय घेतला आहे की बकऱ्यांची कुर्बानी दुसऱ्या दिवशी दिली जाईल. आमच्या गावात 10 ते 12 लाख लोक आषाढीच्यानिमित्ताने दर्शनासाठी येतात. मी महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करेन की दोन्ही समाजातील सलोखा वाढावा म्हणून आषाढीच्या दुसऱ्या दिवशी कुर्बानी करण्याचा विचार करावा. आपल्याला 3 दिवसांमध्ये कधीही कुर्बानी देता येईल," अशी प्रतिक्रिया नोंदवली. मागील वर्षाप्रमाणे यंदाही मुस्लिम समुदायाने बकरी ईदची कुर्बानी आषाढीच्या दिवशी सादर न करण्याचा निर्णय घेतला असल्याने मंदिर समितीकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. समस्त गावकऱ्यांकडूनही आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो असं मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.