मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारं आहे. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. तसेच अनेक शहरांमध्ये सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे जी लोकं घरापासून लांब कामासाठी आली आहेत अशा लोकांची आपल्या गावी जाण्यासाठी मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळते आहे. दिल्ली, मुंबई, नागपूर, पुणे, पटना, अलीगड, बंगळुरू, हैदराबाद, भोपाळ, रायपूर, जयपूर अशा ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या अधिक दिसते आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने विविध राज्यांमधून मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये आलेले लोकं आपल्या गावी, आपल्या राज्यात जाण्याची घाई करत आहेत. त्यामुळे स्थिती हाताळणं अशक्य होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरी जाण्यासाठी घाई करणाऱ्या लोकांना कदाचित याचं गांभिर्य नाही की ते काय चूक करत आहेत. कारण घरी जात असताना अनेक लोकांच्या संपर्कात लोकं येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे जी लोकं परदेशातून भारतात आले आहेत. ती लोकं देखील लपून रेल्वेने प्रवास करत आहेत. ज्यांना घरा बाहेर पडण्यासाठी मनाई आहे अशी लोकं प्रवास करत आहेत. त्यामुळे त्यांना जर कोरोनाची लागण झाली असेल तर प्रवासात इतर लोकांना देखील त्याची लागण होण्याची शक्यता आहे. हळूहळू असंच हे संपूर्ण देशात पसरण्याची भीती आहे.
 
जी लोकं शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन आपल्या गावी जात आहेत. असे लोकं गावी आपल्या कुटुंबाला देखील धोक्यात टाकण्याचं काम करत आहेत. कारण प्रवासात कोणता व्यक्ती कोरोनाची लागण झालेल्या आहे हे कळणं शक्य नाही. त्यामुळे कोरोनापासून जर लांब राहायचं असेल तर सध्या घराच्या बाहेर न पडणं हाच एकमेव उपाय आहे. कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण ती लगेच विकसित होणं शक्य नाही.


भारतीय अजूनही गंभीर नाहीत


कोरोनाचं गांभीर्य अजूनही भारतीयांच्या लक्षात आलेलं नाही. सरकारने घराबाहेर पडण्यास मनाई केली असताना देखील लोकं काम नसताना देखील फिरताना दिसत आहेत. रेल्वेमधील गर्दी अजूनही हवी तितकी कमी झालेली नाही. जर्मनीमधील एका युवकाचा व्हिड़िओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तो ज्याप्रकारे याचं गांभीर्य सांगत आहे. त्यावरुन तरी लोकांनी याबाबत गंभीर होणं गरजेचं आहे.


चीनने बाहेर येण्यावर बंदी घालूनच कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. इतर देशांनी मात्र याबाबत आधीच गंभीर पाऊलं उचलली असती तर त्यांच्या देशात इतक्या लोकांचा मृत्यू झाला नसता. इटली, जर्मनी, अमेरिकेत कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. भारतही आता त्याच मार्गावर जाताना दिसत आहे. जर लोकं अजूनही गंभीरपणे वागली नाहीत तर. 


भारतात होऊ शकते मोठी जीवितहानी 


चीनमधून हा व्हायरस पसरला असला तरी देखील यावर नियंत्रण मिळवणं चीनला एकाच गोष्टीमुळे शक्य झालं ते म्हणजे त्यांच्याकडे हा व्हायरस एका केंद्रस्थानी अधिक प्रमाणात पसरला होता. पण इटली, जर्मनी, स्पेन, अमेरिका, ब्रिटेन आणि भारतात अशी परिस्थिती नाही. इतर देशांमध्ये हा व्हायरस सगळ्या राज्यांमध्ये पसरत चालला आहे. त्यामुळे स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.


भारतासाठी धोक्याची घंटा आहे. कारण भारतात कोरोना जर पसरला तर यांचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील आणि याला जबाबदार असेल फक्त आपले नागरिक. कारण सरकारने कितीही प्रयत्न केला तरी लोकं जोपर्यंत ऐकणार नाही, तो पर्यंत यावर नियंत्रण मिळवणं कठीण आहे. मुंबई, ठाणे, कल्याण अशा ठिकाणी तर अजूनही लोकं सर्व काही बंद असताना देखील रस्त्यावर गर्दी करत फिरत आहेत. भारतात शनिवारी संध्याकाळी 6 पर्यंत जवळपास 325 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. येत्या 24 तासात ही संख्या झपाट्याने वाढत आहे. कारण सुरुवातीला 50 रुग्ण हे 40 दिवसात आढळले होते. पण आता 2 ते 3 दिवसातच हा आकडा बराच पुढे निघून आला आहे. त्यामुळे याला रोखायचं असेल तर लोकांच्या संपर्कात येणं टाळणं हाच एकमेव उपाय सध्या तरी भारतीयांपुढे आहे. 


इतर देशांच्या तुलनेत भारताची लोकसंख्या अधिक आहे. इतर देशांमध्ये जितकी लोकसंख्या तितक्या प्रमाणात रुग्णालय देखील उपलब्ध होतील पण भारतात तसं होणं शक्य नाही. भारतात जर या व्हायरसने पाय पसरवले तर मृतदेहांचा खच साचालया वेळ लागणार नाही. जनता कर्फ्यू याचाच अंदाज येण्यासाठी आहे. जनता किती गंभीर आहे. हे रविवारी कळेल. पण आपण ही आजुबाजुच्या लोकांना आणि मित्र परिवाराला याचं गांभीर्य समजावून सांगणं अधिक महत्त्वाचं आहे.