सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : 
दिग्दर्शन- आशुतोष गोवारिकर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्मिती- सुनिता गोवारिकर, रोहित शेलटकर


कलाकार- अर्जुन कपूर, क्रिती सेनन, संजय दत्त, मोनिष बहल, पद्मिनी कोल्हापूरे आणि इतर.... 


संगीत- अजय, अतुल 


'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा...', या ओळी ओठांवर येतात तेव्हा अंगावर एक काटा उभा राहतो. यामध्ये अभिमान, बलिदान, शौर्य, संताप, चीड, सूड, विरहाचं दु:ख या साऱ्या भावना दाटून आलेल्या असतात. महाराजांनी सुरु केलेली स्वराज्याची परंपरा, या परंपरेची घोडदौड जेव्हा पेशव्यांच्या काळातपर्यंत पोहोचली तेव्हा त्यामध्ये साहसाची, युद्धाची आणि नात्यांची परिभाषा बदललेली होती. मराठ्यांचं साम्राज्य जितकं विस्तारलं होतं, किंबहुना विस्तारत होतं, तितकीच कुटुंबकलहाची वाळवी आतल्याआत पेशवाईला पोखरण्यास सुरुवात करत होती. 


गादीवर कोण बसणार इथपासून युद्धावर सेनापती ते दिल्लीचं तख्त कोण भूषवणार इथपर्यंतच्या  परिस्थितीला पेशवाई सामोरी गेली. याच पेशवाईने मराठा साम्राज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या पानिपतची लढाई पाहिली. जिच्या जखमा आजही ताज्या आहेत. पण, याच लढाईतलं मराठ्यांचं सामर्थ्य या जखमांवर दिलासादायक फुंकर घालत आहे. याच ऐतिहासिक घडामोडीवर आणि परकीयांच्या हिंदुस्थान हादरवणाऱ्या चालीवर Panipatमधून प्रकाशझोत टाकला आहे, दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी. 


रुपेरी पडद्यावर 'पानिपत' घडवणारे चेहरे


अर्जुन कपूर Arjun Kapoor (सदाशिव राव भाऊ), क्रिती सेनन Kriti Sanon (पार्वती बाई), संजय दत्त Sanjay Dutt (अहमद शाह अब्दाली) या कलाकारांच्या साथीने मोनिष बहल, पद्मिनी कोल्हापूरे, झीनत अमान, साहिल सलथिया, नवाब शाह, मंत्रा, गष्मीर महाजनी, रवींद्र महाजनी यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या वाट्याला आलेलं पात्र तितक्याच ताकदीनं साकारलं आहे. त्यामुळे चित्रपटातील प्रत्येक कलाकार पूर्णत: प्रशंसेस पात्र ठरत आहे. 



'सदाशिव राव भाऊ' यांना धनमंत्री करण्यापासून पानिपतच्या युद्धाची रणनिती आखण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यापर्यंत प्रत्येक दृश्यामध्ये अर्जुनने त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला सार्थ न्याय दिला आहे. तर, त्याच्या अर्धांगिनीच्या रुपात झळकणाऱ्या क्रिती सेनन हिने 'पार्वती बाई' यांची भूमिकाही तितक्याच आत्मियतेने साकारली आहे. मुळात हे युद्ध चित्रपटाच्या निमित्ताने पार्वती बाईंच्याच दृष्टीकोनातून साकारण्यात आलं आहे. त्यामुळे त्यामध्ये युद्धभूमीतील साहसासमवेत भावनांचा ओलावाही त्यात आहे. 



चित्रपटामुळे अर्जुन कपूर आणि रणवीर यांच्यात बरीच तुलना झाली होती, पण त्याने अगदी जबाबदारीने आणि समर्पकतेने हे पात्र साकारल्याचं लक्षात येत आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्राची वेशभूषा, आभूषणं ही लक्ष वेधणारी आहेत. तर, मुख्य आकर्षण असणारं संपूर्ण युद्ध हे एका क्षणी अंगावर येणारं ठरत आहे. युद्धभूमीतील प्रत्येक दृश्य हे प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. नजर हटणार नाही, असं हे युद्ध साकारत आशुतोष गोवारिकर यांचं दिग्दर्शन पुन्हा एकदा दाद मिळवून जात आहे. 


पूर्वार्ध आणि उत्तरार्ध मिळवून संपूर्ण चित्रपट हा जास्त वेळासाठी प्रेक्षकांना ऐतिहासिक कालखंडात घेऊन जातो. चित्रपटाचं संगीतही या साऱ्यामध्ये जमेची बाजू ठरत आहे. चित्रपट गीतं आणि त्या गीतांना जोडून येणारे प्रसंग दाद मिळवून जातात. चित्रपटाचं पार्श्वसंगीतही प्रत्येक प्रसंगाचं गांभीर्य प्रत्ययकारीपणे समोर आणत आहे. ज्यावेळी 'पानिपत'मधील कलाकारांचे फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आले, तेव्हा अहमद शाह अब्दाली साकारणारा संजय दत्त हा सदाशिव राव भाऊंच्या भूमिकेत दिसणाऱ्या अर्जुनवर भारी पडणार अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, संजय दत्तने साकारलेल्या अब्दालीला अर्जुनच्या सदाशिव रावांनी चांगली टक्कर दिली आहे हे चित्रपट पाहताना लक्षात येतं. एकंदरच सिनेमॅटिक लिबर्टीचा (गरज होती त्या ठिकाणी ती घेणं आवश्यक ठरलं) विषय काहीसा दूर सारून ही कलाकृती पाहण्याजोगी आहे. त्यामुळे ही 'अर्जुना'च्या 'पानिपत'ची यशस्वी 'क्रिती' आहे असं म्हणायला हरकत नाही. 


SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com