नवी दिल्ली: संपूर्ण देश एकत्रितपणे कोरोनाविरुद्ध लढत असताना भाजप पक्ष भारतात द्वेष आणि धार्मिक भेदभावाचा व्हायरस पसरवत असल्याची खरमरीत टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. त्या गुरुवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या सध्याच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर देशातील परिस्थिती कशी हाताळणार, याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही स्पष्ट कल्पना देण्यात आलेली नाही. ३ मे नंतरही आतासारखाच लॉकडाऊन सुरु राहिल्यास त्याचे परिणाम विनाशकारी असतील, असा इशारा यावेळी सोनिया गांधी यांनी दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परप्रांतीय मजुरांसाठी मुंबई-पुण्यातून विशेष गाड्या सोडा, अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
 
काँग्रेस पक्षाने यापूर्वी केंद्र सरकारच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयाचे कौतूक केले होते. मात्र, ३ मे नंतरही लॉकडाऊन सुरु ठेवण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे दिसत आहे. ३ मे नंतर लॉकडाऊन सुरू राहिल्यास समाजातील सर्व घटकांच्या त्रासात भर पडेल. विशेषत: शेतकरी, मजूर, स्थलांतरित कामगार, बांधकाम मजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना याची मोठी झळ बसेल. यामुळे व्यापार, उद्योग आणि कारखाने आभासीरित्या ठप्प होतील. यामुळे कोट्यवधी रोजगार नष्ट होतील, अशी भीती सोनिया गांधी यांनी व्यक्त केली. 



'वाईन शॉप' सुरु करायला काय हरकत, राज ठाकरेंची आग्रही मागणी

यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रात काँग्रेसने शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील नागरिकांच्या यातना कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले. यासाठी आम्ही विविध क्षेत्रातील लोकांचा अभिप्राय घेतला होता. मात्र, केंद्र सरकारने यापैकी मोजक्याच सूचना विचारात घेतल्या. केंद्र सरकारच्या कृतीत आम्हाला करुणा, दिलदारपणा आणि उत्साहपूर्ण तत्परतेचा अभाव दिसला, असेही सोनिया गांधी यांनी बैठकीत सांगितले.