'वाईन शॉप' सुरु करायला काय हरकत, राज ठाकरेंची आग्रही मागणी

महाराष्ट्राचं रूतलेलं अर्थचक्र बाहेर काढावंच लागेल, 

Updated: Apr 23, 2020, 03:21 PM IST
'वाईन शॉप' सुरु करायला काय हरकत, राज ठाकरेंची आग्रही मागणी title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या साधारण महिन्याभरापासून देशा आणि राज्यातील अनेक उद्योग, व्यवसाय, कार्यालयं आणि दैनंदिन जीवनातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाकडून काही उपाययोजनांचीही आखणी केली जात आहे. ज्यामध्ये त्यांना मित्रपक्षांचीही साथ मिळत आहे. यातच आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक जाहीर आवाहन केलं आहे. 

'महाराष्ट्राचं रूतलेलं अर्थचक्र बाहेर काढावंच लागेल, अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय घ्यावेच लागतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं जाहीर आवाहन...', असं लिहित ठाकरे यांनी ट्विट करत या आवाहनपर पत्राची प्रत जोडली. ज्यामध्ये त्यांनी हॉटेल उद्योगांपासून वाईन शॉप्स उघडण्यापर्यंतच्या गोष्टींचा उल्लेख केल्याचं स्पष्ट झालं. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाईन शॉप्स सुरु करण्याच्या मागणीवरुन बऱ्याच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही निर्बंध ठेवत वाईन शॉप सुरु करण्याची चिन्हं मधल्या काळात दिसली होती. वाईन शॉप सुरु करण्याचा हाच मुद्दा  राज ठाकरे यांनी मांडत आग्रही सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. 

आणखी किती दिवस ही परिस्थिती पुढे अशीच सुरु राहील याची काहीच खात्री नाही बाह मांडत त्यांनी राज्याच्या तिजोरीवर येणारा बोजा अधओरेखित केला. तर, या परिस्थितीमध्ये वाईन शॉप्स सुरु करुन राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला हरकत काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

वाईन शॉप सुरु करणं म्हणजे दारु पिणाऱ्यांचा विचार करणं असं नसून, राज्याच्या महसुलाचा विचार करणं असल्याचं सांगत या प्रश्नाचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. सध्याच्या घडीला राज्याचा आटलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये राज्याची परिस्थिती पाहता वाईन शॉप्सच्या मार्गाने येणारा महसूल मोठा आहे यावर त्यांनी भर दिला. 

 

इतर व्यवहारही हळुहळू सुरु करा.... 

भाजीपाला, फळविक्री, बेकरी, किराणा अशा सुविधा काही ठिकाणी सुरु आहेत, पण त्यांच्यात सुसूत्रता आणली गेली पाहिजे. थोडक्यात हळूहळब राज्याचं अर्थचक्र पुन्हा एकदा सुरु करण्याची गरज आहे. जनतेचं सहकार्य मिळत राहीलच. पण, आपणही त्यांचं जगणं सुसह्य करण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेना या परिस्थितीशी लढण्यासाठी काही सल्ले दिले.