नवी दिल्ली: भारताने चीनमधून आयात केलेली अनेक पर्सनल प्रोटेक्शन किटस् (PPE kit) सदोष असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसपासून (Corornavirus) आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी ही किटस् वापरली जातात. भारतातील रुग्णालयांमध्ये सध्या या किटसचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारताने चीनकडून पीपीई किटस आयात केली होती. पीपीई किटसची पहिली बॅच नुकतीच भारतात पोहोचली होती. मात्र, आता यापैकी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ६३ हजार किटस ठरवून दिलेल्या निकषांत बसत नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे भारताने चीनकडून रॅपिट टेस्ट किटस आणि अन्य वैद्यकीय साधनसामुग्रीही मागवली आहे. त्यामुळे आता त्यामध्येही दोष असल्यास देशातील आरोग्य यंत्रणांसमोर मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे. 
कोरोनासारख्या संकटाच्या काळातही इतर देशांना सदोष वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्याची चीनची ही पहिली वेळी नाही. यापूर्वी चीनने स्पेनला कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारी किटस् विकली होती. मात्र, या किटसमध्ये त्रुटी असल्यामुळे स्पेनमध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरला होता. यानंतर स्पेनने ५० हजार दोषपूर्ण किटस् पुन्हा चीनला पाठवून दिली होती. नेदरलँडसला पाठवण्यात आलेली चिनी मास्कही असेच बनावट असल्याचे आढळून आले होते. संबंधित देशांनी याविषयी जाब विचारल्यानंतर चीनने आपली चूक मान्य करण्यास नकार दिला होता. 


सरकारचा मोठा निर्णय; देशातच बनवणार १० लाख किटस्

याशिवाय, इटलीसंदर्भातील एक किस्साही काही दिवसांपूर्वीच प्रचंड चर्चेत होता. स्पेक्टॅटर नियतकालिकाच्या माहितीनुसार, वुहानमध्ये कोरोना थैमान घालत असताना इटलीने चीनमधील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी PPE किटस् फुकटात देऊ केली होती. मात्र, जेव्हा कोरोनामुळे इटली संकटात सापडली तेव्हा हीच किटस् चीनने त्यांना पैसे घेऊन विकल्याचा प्रकार समोर आला होता.