सरकारचा मोठा निर्णय; देशातच बनवणार १० लाख किटस्

कालच चीनमधून भारतात तब्बल ६.५ लाख किटस् आयात करण्यात आली होती. मात्र, भारताची लोकसंख्या पाहता ही किटस् अपुरी पडणार हे स्पष्टपणे दिसत आहे. 

Updated: Apr 17, 2020, 05:37 PM IST
सरकारचा मोठा निर्णय; देशातच बनवणार १० लाख किटस् title=

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) चाचणीसाठी किटसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मे महिन्यापर्यंत स्वदेशी बनावटीच्या तब्बल १० लाख किटसची निर्मिती करण्यात येईल. जेणेकरून देशभरात कोरोनाच्या चाचण्यांचा वेग वाढवता येईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. कालच चीनमधून भारतात तब्बल ६.५ लाख किटस् आयात करण्यात आली होती. मात्र, भारताची लोकसंख्या पाहता ही किटस् अपुरी पडणार हे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने आता देशातच ही किटस् तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 

दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत १००७ जणांची भर पडली आहे. तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. 

यासंदर्भात बोलताना भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (ICMR) डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले की, कोरोना विषाणू गेल्या तीन महिन्यांपासून भारतात आहे. विषाणूमध्ये फार लवकर बदल (म्युटेशन) घडून येत नाहीत. त्यामुळे आता एकदा कोरोनावर लस सापडली तर पुढे बराच काळ ती फायदेशीर ठरेल, असे डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊननंतर भारतातील कोरोनाच्या वाढीचा वेग मंदावल्याचेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. लॉकडाऊनपूर्वी साधारण तीन दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. मात्र, आता हा कालावधी ६.२ दिवसांवर आला आहे.