केजरीवालांच्या अटकेवरुन पवारांकडून मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल! म्हणाले, `सरकार लोकशाहीचा...`
Arvind Kejriwal Arrested Pawar Family Reacts: 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आल्याने दिल्लीसहीत देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अटकेचा विरोधकांनी निषेध केला आहे.
Arvind Kejriwal Arrested Pawar Family Reacts: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने गुरुवारी रात्री अटक केली. मनी लॉन्ड्रिंगचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना तपासाठी घरी गेलेल्या 7 ते 8 अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अटक करण्यात आली. केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पार्टीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. केजरीवाल यांच्या अटकेनंतर विरोधकांनी सत्ताधारी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वखालील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवारैमा या अटकेवरुन सरकावर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी पत्रकार परिषदेमधून या अटकेवरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
मोदी सरकार लोकशाहीचा गळा दाबत असून निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच केजरीवालांना अटक करण्यात आल्याचं पवारांनी म्हटलं आहे. "केजरीवाल यांच्या अटकेचा मी तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो. मोदी सरकार लोकशाहीचा गळा दाबत आहे. यापूर्वी असं कधीही घडलेलं नाही," असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे. "निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या पारदर्शकेबद्दल चिंता वाटत आहे. आधी सोरेन यांनी अटक करण्यात आली. त्यानंतर आता केजरीवालांना बेड्या घालण्यात आल्या आहेत. उद्या अजून कोणाला अटक होईल, धोरण ठरवलं म्हणून अटक करणं पूर्णपणे चुकीचं आहे," असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच इंडिया आघाडी म्हणून आम्ही केजरीवाल यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहणार, असंही शरद पवारांनी सांगितलं.
नक्की वाचा >> 'भाजपा घाबरलीये! चुकून 2024 ला सत्तेत आल्यास..'; पवार आत्या-भाच्याचा मोदी सरकारला टोला
निवडणुका तोंडावर असताना
शरद पवार यांनी गुरुवारी रात्रीच आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केली. "विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी प्रतिशोध घेण्याच्या हेतूने विशेषत: सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असताना केंद्रीय एजन्सींच्या गैरवापर करण्याचा मी तीव्र निषेध करतो. या अटकेवरून भाजप सत्तेसाठी किती खालच्या स्तरावर हे दिसून येते. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील असंवैधानिक कारवाईच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी एकजुटीने उभी आहे," असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> केजरीवाल यांना जेलमधून मुख्यमंत्री म्हणून काम करता येईल का? कायदा काय सांगतो?
दिल्ली उच्च न्यायालयाकडे केजरीवाल यांनी अटकेपासून संरक्षण देण्यासंदर्भातील दिलासा मागणारी याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळल्यानंतर 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.