Devika Thakur Murder Case: मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील वेदिका ठाकुर (Devika Thakur) हत्याकांड प्रकरणामध्ये मोठा खुलासा तपासादरम्यान झाला आहे. मृत्यूशी 11 दिवस झुंज दिल्यानंतर वेदिकाचा सोमवारी उपचारादरम्यान सुभाषचंद्र बोस रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला भारतीय जनता पार्टीचा नेता प्रियांश विश्वकर्माच्या (Priyansh Vishwakarma) क्रूर कृत्याबद्दलची माहिती समोर आली आहे. चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार गोळी मारल्यानंतर प्रियांश जखमी अवस्थेतील वेदिकाला स्वत:च्या कारमधून 7 तास शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर फिरत होता. एमबीएसची विद्यार्थीनी असलेल्या वेदिका ठाकुरला 16 जून रोजी प्रियांशच्या कार्यालयामध्ये गोळी मारण्यात आली होती. जखमी अवस्थेतील वेदिकाला लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं.


कारमधून तिला 7 तास फिरवत होता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेदिकाच्या मृत्यूनंतर प्रियांशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदिकाच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या माहितीनुसार रक्तबंबाळ झालेल्या वेदिकाला आपल्या कारमध्ये टाकून प्रियांश शहरभर कार फिरवत होता. तब्बल सात तास जखमी अवस्थेमधील वेदिका कारमध्ये विव्हळत होती. वेदिकाचा मृत्यू होण्याची तो वाट पाहत होता का? वेदिकाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रियांशचा विचार होता का? यासंदर्भातील तपास सध्या सुरु आहे.


पुरावे मिटवण्याचा प्रयत्न


समोर आलेल्या माहितीनुसार प्रियांशने वेदिकावर केलेल्या हल्ल्याचे पुरावे मिटवण्याचाही प्रयत्न केला होता. यासंदर्भातील गुन्हाही त्याच्याविरोधात नोंदवण्यात आला आहे. प्रियांश हा स्वत: एक बिल्डर असल्याने आपल्या प्रभावाचा फायदा उचलून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने 16 तारखेला वेदिकाला ऑफिसमध्ये भेटण्यासाठी बोलवलं तेव्हाच तिच्या पोटात गोळी मारल्याचं सांगितलं जात आहे. प्रियांशने ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीचा त्याच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर डेटा आणि ज्या पिस्तुलने गोळीबार केला ती पिस्तूल घेऊन पळ काढला. पोलिसांनी 3 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर 19 जून रोजी प्रियांशला अटक केली. पोलिसांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार प्रियांशच्या ऑफिसमधील सीसीटीव्हीचा डेटा खराब झाला असला तरी सर्व्हर कंपनीकडे हा डेटा असेल अशी अपेक्षा व्यक्त केली असून हा डेटा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात या कंपनीला पत्रही पाठवण्यात आलं आहे. 


मुख्यमंत्र्यांना केलं लक्ष्य


दरम्यान, वेदिकाच्या मृत्यूनंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. महिलांविरोधातील आरोपांमध्ये तुमच्याच पक्षाचे नेते कसे काय असतात? आपल्याच पक्षातील लोकांवर कारवाई करु शकत नाहीत मुख्यमंत्री एवढे कमकुवत आहेत का? असा सवाल कमलनाथ यांनी ट्वीटरवरुन विचारला होता.