Devika Thakur Died: मध्य प्रदेशमधील जबलपूर (Jabalpur) येथे मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु असलेल्या वेदिका ठाकुर (Devika Thakur Dies) या तरुणीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज सोमवारी संपली. 16 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या (BJP leader) नेत्याच्या ऑफिसमध्ये वेदिकावर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर मागील 10 दिवसांपासून शहरातील सुभाष चंद्र बोस रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. वेदिकाला लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं. मात्र सोमवारी (26 जून 2023 रोजी) तिची प्राणज्योत मालवली. या हत्याकांडामधील आरोपी आणि भाजपाचा स्थानिक नेता प्रियांश विश्वकर्मा (Priyansh Vishwakarma) हा आधीपासूनच अटकेत असून आता त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियांशने वेदिकाला भाजपा ऑफिसमध्ये बोलवलं आणि तिच्या पोटामध्ये गोळी मारली. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वेदिकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. ही घटना समोर आल्यानंतर आरोपी प्रियांशला अटक करण्यात आली आहे. नेमका घटनाक्रम अद्याप पोलिसांना समजलेला नाही. आरोपी प्रियांशने चुकून गोळी सुटल्याचा दावा केला आहे. मी मुद्दाम गोळी मारली नाही तर चुकून गोळी सुटल्याचा दावा प्रियांशने पोलीस चौकशीमध्ये केला. मात्र पोलिसांना प्रियांश करत असलेले दावे पटलेले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. 16 जून रोजी ही घटना घडली तेव्हा प्रियांश विश्वकर्माच्या कार्यालयामधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद पडला होता असं पोलिस तपासात समोर आलं आहे. प्रियांश हा एक बिल्डर असल्याने त्याच्या कार्यालयात झालेल्या हत्येची बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरली. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत असून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
वेदिका ठाकूरच्या नातेवाईकांनी सुरुवातीपासूनच पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेतला आहे. वेदिकाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून पोलीस आरोपीविरोधात कठोर कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आरोपी प्रभावशाली व्यक्ती असल्याने पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करायला घाबरत असल्याचाही वेदिकाच्या नातेवाईकांचा आरोप आहे.
या प्रकरणावरुन काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी ट्वीटरवरुन टीका करताना भाजपा सरकारला लक्ष्य केलं. "जबलपुरमधील मुलगी वेदिका ठाकुरचं निधन झाल्याची बातमी समजली. तिच्या मृत्यूबद्दल मी शोक व्यक्त करतो. ईश्वर तिच्या आत्म्याला शांती देवो. तिच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. मी मुख्यमंत्र्यांना विचारु इच्छितो की महिलांविरोधातील अत्याचार प्रकरणामध्ये तुमच्या पक्षाच्या लोकांचा थेट समावेश असल्याचं कारण काय? तुम्ही यांना रोखू शकत नाही इतके तुम्ही इतके लाचार आहात का? की तुम्हाला त्यांना थांबवायचं नाहीये?" असा प्रश्न कमलनाथ यांनी विचारला आहे.