काँग्रेसच्या संकटमोचकावर `ईडी`चे संकट; डी.के. शिवकुमार यांची चौकशी होणार
मला त्रास देणार हे भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीच जाहीरपणे सांगितले आहे.
नवी दिल्ली: कर्नाटकातील काँग्रेस पक्षाचे संकटमोचक अशी ओळख असलेले डी.के. शिवकुमार हेदेखील 'ईडी'च्या (सक्तवसुली संचलनालय) फेऱ्यात सापडले आहेत. ईडीने नोव्हेंबर २०१८ मध्ये शिवकुमार यांना नोटीस बजावली होती. परंतु शिवकुमार यांनी चौकशीसाठी हजर न राहण्याची सुट मागितली होती. परंतु त्यांना ईडीकडून दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर त्यांनी याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती. परंतु गुरूवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने शिवकुमार यांची याचिका फेटाळली. त्यामुळे आता डी.के. शिवकुमार यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. आज त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
मात्र, शिवकुमार यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. मी कोणतेही अनैतिक कृत्य केलेले नाही. मला त्रास देणार हे भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीच जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे यामध्ये त्यांना आनंद मिळत असेल तर तो त्यांना मिळू दे. मात्र, मी चौकशीला सामोरे जाऊन पूर्णपणे सहकार्य करणार आहे. सध्या मी काही कामांमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे मी आज दुपारनंतर दिल्लीला जाईन, असे त्यांनी सांगितले.
२०१७ मध्ये ईडीने डी.के.शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवर छापे टाकले होते. या छाप्यात ८ कोटी ५९ लाखांची बेनामी रोकड आढळून आली होती. या प्रकरणात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ईडीने शिवकुमार यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे न्यायालयाकडे तक्रार केली होती.
काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. सध्या ते सीबीआयच्या कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. यानंतर काँग्रेसचा आणखी एक बडा नेता 'ईडी'च्या फेऱ्यात सापडल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.