नवी दिल्ली : केंद्र सरकार हिंदीची सक्ती करत असल्याचा आरोप यापूर्वी केला जात असे. मात्र, आता तर हा संघर्ष थेट चिघळण्याच्याच मार्गावर आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या एका पत्राला उत्तर देताना ‘मला हिंदी समजत नाही’,असे पत्रच एका खासदाराने केंद्राला पाठवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तथागत सत्पथी असे या खासदाराचे नाव असून, ते बीजू जनता दलाचे नेते आहे. केंद्राने पाठवलेल्या एका पत्राला उत्तर देताना त्यांनी थेट उडिया भाषेतूनच पत्र लिहीले आहे. केंद्राकडून हिंदीची सक्ती होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत ‘केंद्रीय मंत्री हिंदी न बोलणाऱ्या लोकांवरही हिंदी भाषेची सक्ती का करत आहे ?, हे या देशातील अन्य भाषांवर आक्रमण नाही का?', असा सवाल उपस्थित केला आहे.


दरम्यान, केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सर्व खासदारांना एक पत्र पाठवले होते. हे पत्र जिल्हापातळीवर आयोजित ‘भारत २०२२’ व्हिजन या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती करणारे होते. मात्र, पत्रातील मजकूर हिंदीतून होता. नेमका यावरच आक्षेप घेत सत्पती यांनी मला हिंदी समजत नाही असे म्हटले आहे. तोमर यांनी पाठवलेले पत्रही सत्पती यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. तसेच, या पत्राला उडीया भाषेत पत्र लिहून ‘तुमचे पत्र हिंदी भाषेत असून मला हिंदी भाषा समजत नाही’असे प्रत्युत्तर दिले आहे.