बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) पुन्हा एकदा नावात अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्या नावाचा समावेश केल्याने संतापल्या. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनकड (Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar) यांनी नाव पुकारताना जया अमिताभ बच्चन असा उल्लेख केल्याने त्यांचा पारा चढला. तुम्ही हा नवा ड्रामा सुरु केला आहे अशा शब्दांत त्यांना आपला संताप व्यक्त केला. दरम्यान यावेळी अध्यक्षांनी त्यांना तुम्ही नावात बदल करु शकता असं सुचवलं. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांनी जया बच्चन यांचं नाव पुकारताना संपूर्ण नाव घेतलं. यानंतर जया बच्चन उभ्या राहिल्या आणि अमिताभ यांच्या नावाचा वापर केल्याने आपला निषेध नोंदवला. तुम्हाला अमिताभ याचा अर्थ माहितीये ना? अशी विचारणाच जया बच्चन यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी त्यांना थांबवत तुम्ही बदलून टाका असं सुचवण्याचा प्रयत्न केला. 


जया बच्चन म्हणाल्या की, "तुम्हाला अमिताभ नावाचा अर्थ माहिती आहे ना? मला माझ्या लग्नाचा आणि नवऱ्याचा फार अभिमान आहे". त्यावर जगदीप धनकड यांनी त्यांना रोखलं आणि सभागृहातील सदस्यांना आपण नावात बदल करु शकतो त्यासाठी एक प्रक्रिया आहे असं सांगितलं.



ते म्हणाले की, "जे नाव निवडणूक प्रमाणपत्रात येतं आणि जे येथे दाखल केलं जात त्यात बदल करण्यासाठी प्रक्रिया आहे. मी स्वत: 1989 मध्ये या सुविधेचा लाभ घेतला आहे". त्यावर जया बच्चन यांनी मला माझ्या नवऱ्याचा आणि त्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या यशाचाही अभिमान आहे. ते कोणी मिटवू शकत नाही. हा नवीन ड्रामा तुम्ही सुरु केला आहे. याआधी असं होत नव्हतं असं सांगत पुन्हा एकदा संताप व्यक्त केला.


त्यावर उत्तर देताना अध्यक्षांनी निवडणूक प्रमाणपत्रावर दिसणारे नाव बदलण्याची तरतूद असल्याचे स्पष्ट केले. तसंच संपूर्ण देशाला अमिताभ बच्चन यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे असं उत्तर दिलं. तसंच आपण एकदा फ्रान्स दौऱ्यात असताना हॉटेलमध्ये ग्लोबल आयकॉन यांच्या फोटोंमध्ये अमिताभ बच्चन यांचा फोटो होता अशी आठवण सांगितली. 


केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांच्या आधी त्यांच्या पत्नीचं नाव जोडा, असं जया बच्चन यावेळी उपहासात्मकपणे म्हणाल्या. मी याविरोधात नाही पण हे चुकीचं आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यावर जगदीप धनकर यांनी मी अनेकदा माझ्या पत्नीचं नाव लावलं आहे असं सांगितलं. मी तुमच्या भावनांचा आदर करतो असंही ते म्हणाले. 


त्यावर खट्टर यांनी उपरोधिकपणे उत्तर दिलं की, "माझ्या समोर माझ्या पत्नीचं नाव या जन्मात तरी येणार नाही (खट्टर अविवाहित असल्याने) तुम्हाला पुढच्या जन्मापर्यंत वाट पाहावी लागेल."