गुजरातची निवडणूक होईपर्यंत चीनचं सैन्य वाट पाहत होतं का?; तवांगमधील घुसखोरीनंतर संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut : तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूचे जवान जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भारतीय सैनिकांनी गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
India China Conflict : एकीकडे पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरीचा प्रयत्न होत असताना चीननेही पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाय. अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आलीय. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले आहेत. जून 2020 गलवानच्या घटनेनंतर, चिनी सैन्याने 9 डिसेंबरच्या सकाळी अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये (Tawang) घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही बाजूच्या सैनिकांनी एकमेकांना लाठ्या-काठ्याने मारहाण केली. यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. खासदार संजय राऊत यांनी चकमकीवरुन मोदी सरकारवर (Modi government) टीका केलीय.
राज्यकर्त्यांनी सीमांकडे लक्ष द्यावे - संजय राऊत
"भारत चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेशात तणाव वाढला आहे. चीनचे सैन्य गुजरातची निवडणूक होईपर्यंत वाट पाहत होतं का? देशातल्या निवडणुका होईपर्यंत चीन शांत होतं की त्यांना शांत राहायला सांगितले होते. लडाख, डोकलाम झालं आणि आता तवांगला घुसले आहेत. लडाखमधून चिनी सैन्य बाहेर काढलं, चर्चा झाली. आता ते तवांगमध्ये घुसले. देशाच्या राज्यकर्त्यांनी राजकारणाकडे थोडं कमी लक्ष देऊन देशाच्या सीमा असुरक्षित झाल्यात त्यावर लक्ष द्यावे. तिथे लक्ष दिले तर राष्ट्राची सेवा होईल," असे संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा >> तवांगवर ताबा मिळवण्यासाठी चीन देणार युद्धाची हाक, इथं असं दडलंय तरी काय?
पंतप्रधान देशापासून काहीतरी लपवत आहेत
"सरकार राजकारणात गुंतून पडल्यामुळे चीन, पाकिस्तान आणि इतर शत्रू सीमेवर धडका मारत आहेत आणि सरकार ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीये. पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांनी सातत्याने देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केलाय हे तवांगच्या घटनेवरुन स्पष्ट दिसत आहे. तवांगमध्ये शुक्रवारी झडप झाली आणि काल हे प्रकरण समोर आले. सत्य काय आहे कळायला मार्ग नाही. सैनिक जखमी झालेत की शहीद याची कोणतीही माहिती द्यायला सरकार तयार नाही. गलवानमध्ये जे झालं तेच तवानच्या बाबतीत होताना दिसतंय," असेही संजय राऊत म्हणाले.
भारतीय सैन्याने काय म्हटलं?
ही माहिती समोर आल्यानंतर भारतीय सैन्याने प्रतिक्रिया दिलीय. अरुणाचल प्रदेशातील तवांग (China) सेक्टरमध्ये प्रत्यक्ष निरीक्षण रेषेच्या जवळच्या भागाबाबत वेगवेगळे दावे करण्यात येतायत. त्यामुळे दोन्ही बाजूचे सैन्य आपापल्या दाव्यानुसार गस्त घालते आणि हे 2006 पासून सुरू आहे. 9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन्ही बाजूच्या सैनिकांना जखमा झाल्या आहेत. चकमकीनंतर दोन्ही बाजूचे सैनिक मागे गेले. त्यानंतर भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी शांतता कायम राहावी यासाठी चिनी अधिकाऱ्यांसोबत फ्लॅग मिटींग घेतली.