नवी दिल्ली: काश्मीर खोऱ्यातील त्राल आणि पुलवामा सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी भारतीय लष्कर आणि दहशतवादी आमनेसामने आले. यावेळी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे वृत्त आहे. अजूनही या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय लष्कराकडून खबरदारीचा उपाय म्हणून शोधमोहीम राबवली जात आहे. या सहा दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय लष्कराच्यादृष्टीने मोठे यश मानले जात आहे. काहीवेळापूर्वीच या दहशतवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला. हे सर्व दहशतवादी झाकीर मुसा याच्या संघटनेतील असण्याची शक्यता आहे. या चकमकीनंतर परिसरातील इंटरनेट व मोबाईल सेवा खंडित करण्यात आली. भारताच्या सुरक्षा दलांनी या वर्षभरात २३० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी शुक्रवारी केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानच्या गोळीबारात ज्युनिअर कमिशंड अधिकारी (जेसीओ) शहीद झाले. तर अन्य एक जवान गंभीर जखमी झाला होता. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना हा जवान शहीद झाला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही जशास तसे उत्तर दिले, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.


काही दिवसांपूर्वी पुलवामा जिल्ह्यातील सिरनू या गावात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीवेळी भारतीय जवानांवर स्थानिक नागरिकांनी जोरदार दगडफेक केली होती. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जवानांनी केलेल्या गोळीबारात सात नागरिकांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले होते.