Maharashtra Weather Updates : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचं प्रमाण अंशत: कमी झालं. काही भाग मात्र याला अपवाद ठरले. त्यातच आता पुन्हा एकदा राज्यातील (Maharashtra Weather Updates ) हवामानासंदर्भात काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत राज्यात अवकाळी पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. या इशाऱ्यानुसार मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा तडाखा बसेल. तर, (Nashik) नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, संभाजीनगरात (Sambhaji Nagar) तर, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवकाळी पावसामुळं हातातोंडाशी आलेली रब्बी पिकं धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळं आता शेतकरी वर्गही चिंतेत आला आहे. संपूर्ण परिस्थितीमध्ये मध्य महाराष्ट्रात गारवा कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस थंडीचे असतील याबाबतची स्पष्ट माहितीसुद्धा देण्यात आली आहे. 


देशभरात काय असेल परिस्थिती? 


देशातील हवामानाविषयी सांगायचं झाल्यास, उत्तर भारतामध्ये अचानक झालेल्या पावसामुळं नजीकच्या भागांमध्ये एकाएकी थंडीचं प्रमाण वाढलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन दिवसांमध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी असू शकते. 


हेसुद्धा वाचा : Ayodhya Ram Mandir: अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला, 6 कोटी वर्षं प्राचीन शिळांमधून अवतरणार श्रीराम!



दिल्ली एनसीआर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पावसामुळं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. तर हिमालय पर्वतरांगांच्या क्षेत्रात येणाऱ्या बहुतांश भागांमध्ये हिमवृष्टीचा तडाखा बसू शकतो. (Jammu Kashmir) जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल (Himachal Pradesh ) या भागांमध्ये गारपीटीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


देशात अचानक का झाली पावसाची सुरुवात? 


हवामान विभागाच्या माहितीनुसार पश्चिमी झंझावातामुळं राजस्थानातील हवामानावर थेट परिणाम दिसून येत आहेत. ज्यामुळं इथं पुढील 24 तासांमध्येसुद्धा पावसाची दमदार हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे. पण, भरतपूरचा भाग वगळता उर्वरित राजस्थानात कोरड्या वाऱ्यांचं सत्र सुरुच राहील. ज्यामुळं येथील किमान तापमानात काही अंशांची वाढही नोंदवली जाऊ शकते असं सांगण्यात येत आहे.