`..तर बाप म्हणून जगण्यात अर्थ नाही`; फडणवीसांबद्दल बोलताना गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचं विधान
Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad On Devendra Fadnavis: शुक्रवारी रात्री हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर `झी 24 तास`शी बोलताना भाजपा आमदारने आपली बाजू मांडताना देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्याच्या प्रश्नावरही केलं भाष्य
Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad On Devendra Fadnavis: उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जखमी अवस्थेतील महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीमधील भाजपा विरुद्ध शिंदे गट वाद शिगेला पोहचला आहे. मात्र पोलिसांसमोरच 5 गोळ्या झाडणाऱ्या भाजपा आमदाराने या घटनेनंतर काही धक्कादाय खुलासे केले आहेत. नेमकं पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं याबद्दलची माहिती आमदार गायकवाड यांनी दिली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वात वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असताना त्याच पक्षाचा आमदार कायदा हातात घेतो, यासंदर्भात 'झी 24 तास'शी बोलताना आमदार गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यावरही प्रतिक्रिया नोंदवली आहे. (गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबार प्रकरणाचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
नेमका वाद कशामुळे? गणपत गायकवाड यांनी दिलं उत्तर
नेमकं हा वाद कशामुळे झाला असा प्रश्न गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, "मी 10 वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती. मी दोन ते तीन वेळा त्यांना पैसे दिले. मात्र नंतर ते सह्या करण्यासाठी येत नव्हते. मग आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात केस जिंकलो आम्ही. केस जिंकल्यानंतर 7/12 आमच्या कंपनीच्या नावे झाला. त्यावेळेस महेश गायकवाडने त्या जागेवर जबरदस्ती कब्जा केला. मी त्यांना परवा विनंती केली होती की जबरदस्तीने कब्जा घेऊन नका. तुम्ही कोर्टात जा. कोर्टातून ऑर्डर आणली तर आम्ही लजेच जागा देऊन टाकू. दादागिरी करु नका. त्यांनी परवाही दादागिरी केली. आजही कंपाऊंड तोडून आले ते. आजही पोलीस स्टेशनसमोर 400-500 लोक घेऊन आले होते ते तिथे. माझा मुलगा पोलीस स्टेशनच्या बाहेर जात होता. त्याने त्याला धक्काबुक्की केली. मला ते सहन झालं नाही," असं गणपत गायकवाड यांनी सांगितलं.
नक्की वाचा >> "शिंदे CM असतील तर महाराष्ट्रभर गुन्हेगारच पैदा होतील"; गोळीबार करणाऱ्या BJP आमदाराचा हल्लाबोल
फडणवीसांसंदर्भात प्रश्न विचारला असता म्हणाले...
तुमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असून तुम्ही कायदा हातात घेत आहात आणि पश्चाताप नाही असं सांगत आहात, असा संदर्भ देत गणपत गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, "मी एक व्यवसायिक माणूस आहे. मला अजिबात पश्चात नाही. माझं आयुष्य खराब होत असेल. माझ्या मुलांसाठी मी एवढं केलं. माझ्या मुलांना कोणी गुन्हेगार मारत असतील. मी जगण्यात अर्थ नाही. एक बाप म्हणून मी माझ्या मुलाला मारत असतील तर ते कदापी सहन करु शकत नाही," असं गणपत गायकवाड म्हणाले.
नक्की वाचा >> 'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी
मी त्यांना जवे मारणार नव्हतो...
तुम्ही पोलिसांसमोर 5 गोळ्या झाडल्या असा आरोप आहे, असं म्हणत गणपत गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, "हो मी स्वत: गोळ्या झाडल्या. मला काही पश्चाताप नाही. माझ्या मुलांना पोलिसांसमोर जर मारत असतील तर मी काय करणार?" असा प्रश्न उपस्थित केला. "पोलिसांनी पकडलं मला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण माझ्याबरोबर असं कोणी करत असेल पोलिसांसमोर तर मला आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रभर असेच गुन्हेगार पाळून ठेवलेले आहेत," असं आमदार गणपत गायकवाड म्हणाले.