`... म्हणून भुजबळांना डावललं`; रोहित पवार- जयंत पाटलांचं नाव घेत हाकेंचा खळबळजनक दावा
Maharashtra Cabinet expansion: छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने राज्यात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एक दावा केला आहे.
Chhagan Bhujbal: महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 10 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जुन्या मंत्रिमंडळातील अनेक प्रस्थापितांना डच्चू देण्यात आला आहे. यात राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांचेदेखील नाव आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने ते नाराज असल्याचे समोर येत आहे. तसंच, भुजबळ समर्थकदेखील नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांचे नाव घेत लक्ष्मण हाके यांनी खळबळनजक दावा केला आहे. तसंच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांचं मंत्रीपद फक्त अजित पवारांमुळे डावण्यात आले आहे. पवारांनी याचे उत्तर द्यावे नाहीतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री बनवावे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळात 15 ते 16 ओबीसी नेत्यांना शपथ दिली असली तरी ओबीसीचा मुख्य आवाज छगन भुजबळ यांना का डावलण्यात आले. अजित पवारांनी याचे उत्तर द्यावं नाहीतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री बनवावे, अशी मागणी हाके यांनी केली आहे. तर, रोहित पवार आणि जयंत पाटील यांना सत्तेत घ्यायचं होतं, म्हणून छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याचा आरोपदेखील हाके यांनी केला आहे.
दरम्यान, रविवारी फडणवीस सरकारच्या 42 मंत्र्यांनी शपथ घेतली. तर, एक मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळं या मंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार हे अद्याप समजू शकलेले नाही. राष्ट्रवादीकडे हे मंत्रीपद जाणार का, अशा चर्चा रंगल्या आहेत.
भुजबळ समर्थक आक्रमक
नागपूर येथील शपथविधी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथाओबीसी चेहरा असलेले सीनियर नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात डावल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे येवल्यातील पदाधिकारी तथा भुजबळ समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून संपर्क कार्यालय येवला येथे "भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है "अशा घोषणा देत जर भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही तर येवल्यारील सर्व ५०० पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची घोषणा या पदाधिकाऱ्यांनी केली आहे