नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघ माढा इथे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता निर्माण झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. मात्र त्यातही माढ्याच्या जागेबाबत काहीही निर्णय झालेला नाही. माढ्याची उमेदवारी जाहीर केली नसल्यामुळे मोहिते पाटील नाराज आहेत. आज विजयसिंह मोहिेते पाटलांनी दुपारी ३ वाजता शिवरत्न बंगल्यावर समर्थक आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावलीय. या बैठकीनंतर पक्ष सोडण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. मोहिते कुटुंब भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे माढ्यातील आजच्या बैठकीकडे आणि मोहिते पाटलांच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांनी माढ्यातून उमेदवारी माघारी घेतली काय सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात खूप मोठी उलथापालथ झालीय. लोकसभा निवडणूक २०१९ च्या तोंडावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि शरद पवारांचे मित्र आणि जास्त जवळीक असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपा प्रवेश निश्चित झालाय. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही सोलापूर जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांची बैठक घेऊन रणजितसिंह याना भाजपामध्ये प्रवेश देणार असल्याचं सांगितलंय. 


ब्लॉग : नेमकं कुठे बिघडलं पवारांचं गणित?


यामुळे सोलापुरातल्या मोहिते पाटील विरुद्ध शिंदे गट एकमेकांवर काय कुरघोडी करतील? हे येणाऱ्या काळात दिसून येईल. रणजित मोहिते पाटील यांना भाजपामध्ये प्रवेश देऊन माढा लोकसभेची उमेदवारी दिली तर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा आणखी बळकटी येणार आहे. राष्ट्रवादीला हे खूप महागात पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. 


दरम्यान, १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता मोहिते-पाटलांच्या 'शिवरत्न' बंगल्यावर कार्यकर्त्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आलीय. सर्व कार्यकर्त्यांनी या बैठकीला आवर्जुन उपस्थित राहण्याचे संदेश कार्यकर्त्यांना पोहचवण्यात आलेले आहेत. 


नुकतंच, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया देताना 'माझ्या घरातील मुलाचे हट्ट मी पुरवू शकतो. पण दुसऱ्याच्या घरातील मुलाचे हट्ट मी कसे पुरवू शकतो... त्यांचा हट्ट त्यांच्या वडिलांनी पुरवायला पाहिजे' असं पवारांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा आपल्या मुलासाठी सोडावी, असा आग्रह राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीकडे केला होता. पण राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळली होती. त्यानंतर सुजय विखे यांनी भाजपचा रस्ता धरला. आता राष्ट्रवादीतल्या 'वडिलांनीही' आपल्या मुलांचे हट्ट पुरवण्याचं मनावर घेतल्यानं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर मात्र मोठा पेचप्रसंग उभा राहिलाय.