Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडणार होती. मात्र केंद्रीय निवडणूक समितीमधील भाजपाचे राज्याचे नेतेच आज दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांचा आजचा दौरा रद्द झाला आहे. शुक्रवारी रात्री शिंदे, अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली दौरा केला होता. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. तरी महाराष्ट्रावर सध्या भाजपा फार जास्त प्रमाणात अवलंबून असल्याने केंद्रातूनही जागावाटपामध्ये जास्त तडजोड करण्याची तयारी नसल्याचं चित्र दिसत आहे. जिंकण्याची क्षमता असलेल्या जागांचीच मागणी करा असा थेट संदेशच अमित शाहांनी शिंदे, पवारांना दिला असल्याचं समजते. शुक्रवारी रात्री 1 वाजेपर्यंत चालेल्या बैठकीमध्ये शाहांनी हे संदेश दिल्याचे समजते.


भाजपाचा प्लॅन काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत भाजपाने 400 पारचा नारा दिला असून केवळ भाजपाचे लक्ष्य 370 जागांचे आहे.  त्यामुळेच पहिल्या यादी जाहीर करताना प्रत्येक जागेवर उमेदवार निवडताना जिंकेल त्याला उमेदवारी या सूत्रानुसार भाजपाने उमेदवारांची घोषणा केलेली. आज सायंकाळी नवी दिल्लीमध्ये भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. महाराष्ट्रामधून यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील रवाना झाले आहेत. या बैठकीमध्ये दुसऱ्या यादीवर चर्चा होणार असून त्यात महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, बिहार आणि कर्नाटकमधील आघाडीचं सरकार असलेल्या राज्यांमधील उमेदवारांची नावं निश्चित होतील आणि रात्री उशीरा भाजपाची दुसरी यादी जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 


जागांचे समिकरण कसे?


महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या 48 जागांपैकी भाजपा 32 ते 36 जागांवर लढण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटाला 8 ते 10 जागा मिळण्याची शक्यता असून अजित पवार गटाला 6 ते 8 जागांवर समाधान मानावे लागेल अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे. अन्य एका शक्यतेनुसार अजित पवार आणि शिंदे गटाला एकेरी संख्येतच जागा सोडण्याचा भाजपाचा मानस आहे.


अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं


शुक्रवारी सायंकाळी अजित पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची शाहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली. जवळपास अडीच तास झालेल्या बैठकीत शिंदे गटाने 13 जागांची मागणी केली तर, अजित पवार गटाने 10 जागांची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र भाजपाने महाराष्ट्रातील या महायुतीमधील सहकारी मित्र पक्षांशी झालेल्या चर्चेत जिंकण्याच्या क्षमतेबाबतची आपली भूमिका ठाम ठेवली आहे. जिंकण्याची शक्यता असेल तरच जागा मागावी या धोरणाशी तडजोड करण्यास नकार देत शिंदे आणि पवार गटाची अनुक्रमे 13 आणि 10 जागांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळेच शुक्रवारी महायुतीच्या नेत्यांची शाहांशी झालेल्या बैठकीनंतरही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. 


नक्की वाचा >> भाजपाच्या ‘400 पार’मध्ये अडथळा ठरल्याने निवडणूक आयुक्तांचा राजीनामा? मोदी-शाहांचा उल्लेखासहीत सवाल


दुसरी यादी भाजपासाठी फार महत्त्वाची


भाजपासाठी दुसरी यादी महत्त्वाची असून निवडणुक जाहीर होण्याआधीची ही भाजपाची शेवटची यादी असेल असं मानलं जात आहे. त्यामुळेच ही यादीही जिंकण्याची शाश्वती असेल तरच उमेदवार देणार अशापद्धतीने जाहीर केली जामार आहे. भाजपाने आपले हे धोरण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना स्पष्टपणे सांगितले असून महाराष्ट्रात अधिकची एखादी जागा हवी असल्यास दिलेला उमेदवार जिंकेलच याची खात्री या दोन्ही गटांना मोठा पक्ष असलेल्या भाजपाला द्यावी लागेल. विजयाची खात्री नसेल आणि केवळ अधिक जागा मिळवण्याच्या उद्देशाने वाटाघाटी केल्या जाणार असतील तर भाजपाकडून शिंदे आणि पवार गटाकडून होणारी जागांची मागणी पूर्ण केली जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे.


आगामी बैठकीमध्ये काय होणार?


आता अमित शाहांबरोबर होणाऱ्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडून अधिकच्या जागांची मागणी झाल्यास त्या जागांवर कोण उमेदवार देणार आणि ते जिंकून येण्याची क्षमता किती आहे हे सिद्ध करुन दाखवावं लागणार आहे. हे पटवून दिलं तरच अतिरिक्त जागा भाजपाकडून मित्र पक्षांसाठी सोडल्या जातील. मात्र हे पटवून देण्यास शिंदे आणि पवार गटाला अपयश आल्यास त्यांना भाजपाने देऊ केलेल्या जागांवर समाधान मानावे लागेल.


नक्की वाचा >> 'इलेक्टोरल बॉन्ड' म्हणजे काय? BJP ला 5271 कोटी कसे मिळाले? सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय?


सहा जागांवरुन वाद


समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी 42 जगांबद्दल कोणतेही मतभेद नसले तरी उर्वरित 6 जागांवर कोण लढणार यावरुन बरेच मतभेद असल्याचे समजते. ज्या मतदारसंघांवरुन वाद आहे त्यामध्ये नाशिक, परभणी, सातारा, शिरूर, गडचिरोली, संभाजीनगर या 6 जागांचा समावेश आहे. आता या जागांवर कोणत्या पक्षाचा दावा अधिक मजबूत ठरतो हे उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.