`मंत्रिपद मिळालं नाही म्हणून...`; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन राज ठाकरेंच्या मनसेचा टोला
Raj Thackeray MNS On Maharashtra Cabinet Expansion: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन निशाणा साधला आहे.
Raj Thackeray MNS On Maharashtra Cabinet Expansion: नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यातील देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारला एकूण 42 मंत्री मिळाले असले तरी अद्याप खातेवाटप जाहीर झालेलं नाही. असं असतानाच महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद न मिळालेल्यांची समजूत काढावी लागत आहे. अनेक दिग्गजांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डच्चू देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या वरिष्ठ मंडळीची मनधरणी करण्यासाठी पक्षांची धावपळ सुरु असतानाच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावरुन निशाणा साधला आहे.
कोण कोण परतलं?
मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं नाव नाशिकचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचं आहे. छगन भुजबळ यांनी कालच प्रसारमाध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ते संध्याकाळीच हेलिकॉप्टरने आपल्या मतदारसंघात परतले. भुजबळांप्रमाणेच शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी सावंतही पुण्यात परतल्याची चर्चा आहे. सावंत यांनी तर पक्षाचं चिन्हंही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटमधील फोटोंवरुन काढून टाकलं आहे. त्याचप्रमाणे शिंदेंच्या सेनेचेच विजय शिवतरेंनाही डावलल्यात आल्याने ते मतदारसंघात परतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे रवी राणा यांचीही मंत्रिमंडळ विस्तारामध्ये निराशा झाली आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही.
सोशल मीडियावरुन टीका
अनेक आमदार मंत्रिपद न मिळाल्याने आपआपल्या मतदारसंघात परतल्याने मनसेचे प्रवक्ते तसेच सचिव योगेश खैरे यांनी या नेत्यांवर सोशल मीडियावरुन निशाणा साधला आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याने मतदारसंघात परतलेल्या आमदारांना सुनावलं आहे. "मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने अनेकजण नाराज होऊन अधिवेशनाला उपस्थित न राहता मतदारसंघात परतले अशा बातम्या येत आहेत. यांना त्या मतदारसंघातील लोकांनी मंत्री होण्यासाठी मतदान केलेलं नाही. कायदेमंडळात कायदे बनवणे आणि मतदारसंघातील प्रश्न मांडणे यासाठी यांना विधानसभेत पाठवले आहे. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून अधिवेशन सोडून जाणे हा ज्या मतदारांनी त्यांना विधानसभेत पाठवले त्यांच्याशी एकप्रकारचा द्रोह आहे," असं योगेश खैरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, दुसरीकडे राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष बांधणीसंदर्भातील चर्चेसाठी भेटणार असल्याचं समजतं.