Maratha Aarakshan Nitesh Rane Warns Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या सातव्या दिवशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीचे नेते प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि नितेश राणेंनी जरांगे पाटलांवर टीका करताना मराठा आंदोलनामध्ये राजकीय भाष्य करु नये असं म्हटलं. नितेश राणेंनी तर जरांगेंना नेमकं कोण हे लिहून देत आहे? असा सवाल उपस्थित केला. या टीकेवरुन मनोज जरांगे पाटील यांनी राणेंनी काही बोलू नये असं म्हणत उत्तर आज सकाळी पत्रकारांशी बोलताना दिलं. यावरुन आता नितेश राणेंनी मनोज जरांगेंना थेट इशाराच दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की वाचा >> 'एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय'; जरांगेंचा फडणवीसांना टोला! म्हणाले, 'बांगड्या भरल्यागत चाळे...'


नेमकं घडलं काय?


देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगेनी मंगळवारी केलेल्या टीकेनंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी जरांगेनी आंदोलनाच्या आडून राजकीय वक्तव्य करु नयेत असं म्हटलं आहे. तर नितेश राणेंनी मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे असा सवाल उपस्थित केला आहे. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांना बुधवारी सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जरांगे पाटलांनी कठोर शब्दांमध्ये नितेश राणेंवर निशाणा साधला. ज्या फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं त्यांच्यावर जरांगे टीका करत आहेत असं प्रसाद लाड म्हणालेत. तर नितेश राणेंनी जरांगेंना नेमकं कोण हे लिहून देत आहे? असा सवाल उपस्थित केल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला. या प्रश्नावर जरांगे पाटील यांनी, "आता राणे साहेबांनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. काल माझ्याशी फोन करुन गोडगोड बोलतात. पण आता याच्यापुढे बोलू नका," असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यानंतर पत्रकारांनी प्रसाद लाड यांनी तुमचा बोलवता धनी कोण आहे असा प्रश्न विचारल्याचं पत्रकाराने सांगितलं. यावर संतापलेल्या स्वरात जरांगे पाटलांनी, "त्याला भेटल्यावर सांगतो मी बोलवता धनी कोण आहे आणि काय आहे," असं उत्तर दिलं. या टीकेलाही नितेश राणेंनी उत्तर दिलं आहे.


नक्की वाचा >> संतापलेल्या जरांगेंचा थेट मोदी-शाहांना इशारा; फडणवीसांवर निशाणा साधत म्हणाले, 'असं वागल्यावर...'


नितेश राणेंनी जरांगेंना दिला इशारा


मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नितेश राणेंनी त्यांना इशारा दिला आहे. "माझी किती किंमत आहे ना हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना माहिती आहे. तुमची किंमत मराठा समाजामध्ये ठेवायची असेल तर तुम्ही राजकीय बोलायचं बंद करा," असं नितेश राणे म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, "नितेश राणे आणि राणे कुटुंबाची किती किंमत आहे हे मराठा समाजाला चांगलं माहिती आहे. तुम्हाला तुमची किंमत ठेवायची असेल तर फडणवीसांवर आणि राजकीय बोलायचं थोडं बंद करा. तुमच्या स्क्रीप्ट कशा आणि कुठून येत आहेत हे आम्हाला आज ना उद्या जाहीर करावं लागेल," अशा शब्दांमध्ये नितेश राणेंनी जरांगेंना इशारा दिला आहे.