मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच सरकार आलं खरं मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार रविवारी 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मात्र हा मुहूर्त अवघ्या काही तासांवर आलेला असताना अजूनही  मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग लावली जात आहे. महायुतीतल्या तिन्ही पक्षाचे आमदार शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ करताना दिसत आहेत. वर्षा आणि सागर बंगल्यावर अनेक इच्छुकांनी जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी सकाळपासूनच नेत्यांची गर्दी पाहायला मिळाली. अनेक नेत्यांनी जाऊन फडणवीसांची भेट घेतली आहे. प्रकाश सोळंके, राधाकृष्ण विखे पाटील, संजय राठोड, नमिता मुंदडा, संजय शिरसाट, जयदत्त क्षीरसागर, भरत गोगावले आणि शिवेंद्रराजे भोसलेंनी फडणवीसांची भेट घेतली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आमदार मंत्रीपदासाठी लॉबिंग लावताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेऊन मंत्रीपदासाठी फिल्डींग लावल्याचंही पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पाहायला मिळेल अशी चर्चा आहे. नवीन चेह-यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिलं जाणार असल्याचं कळतंय. अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदेंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी एक दिवस बाकी असताना इच्छुक आमदार वर्षा आणि सागरचे उंबरठे झिजवताना पाहायला मिळत आहेत. 


हेही वाचा : महायुतीच्या मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब, नागपुरात शपथविधीची लगबग


 


महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. भाजपकडून  चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, संभाजी पाटील निलंगेकर, अतुल सावे, रणधीर सावरकर, परिणय फुके, डॉ. संजय कुटे, पंकजा मुंडे मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ, चित्रा वाघ, विजयकुमार देशमुख, गोपीचंद पडाळकर, राहुल कुल, जयकुमार रावल, योगेश सागर, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.


दुसरीकडं राष्ट्रवादीकडूनही मंत्रिपदासाठी काही नावं चर्चेत आहेत. यात छगन भुजबळ,  धनंजय मुंडे, अदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मराम बाबा अत्राम, अनिल पाटील,  नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, दत्तमामा भरणे, मकरंद पाटील, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, सना मलिक यांच्या नावाची देखील चर्चा आहे. 


शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, राजेश क्षीरसागर, दीपक केसरकर, योगेश कदम यांची नावं चर्चेत आहेत.


अनेक आमदारांनी मंत्रीपदासाठी कोट शिवून ठेवलेले आहेत. शेवटच्या क्षणी आपल्या नावावर फुली मारली जाऊ नये यासाठी प्रत्येकजण खबरदारी घेताना दिसतोय. त्यामुळेच भेटीगाठींचा सिलसिला सध्या पाहायला मिळतोय.  त्यामुळे आता मंत्रीपदाच्या माळा कुणाच्या गळ्यात पडणार हे पााहणं महत्त्वाचं ठरणार आहे.