दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात विक्रमी वाहनविक्री
दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात तब्ब्ल नऊ हजार वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी पेक्षा वाहन विक्रीत २५ टक्के वाढ झाली आहे. सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण असताना, वाहन विक्रीतील वाढ उद्योग जगताला दिलासा देणारी आहे.
नितीन पाटणकर, झी मीडिया,पुणे : दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात तब्ब्ल नऊ हजार वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी पेक्षा वाहन विक्रीत २५ टक्के वाढ झाली आहे. सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण असताना, वाहन विक्रीतील वाढ उद्योग जगताला दिलासा देणारी आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी मात्र अद्यापही कायम असल्याचं चित्र आहे. कारण दसऱ्याच्या मुहूर्तावर रिअल इस्टेटचे अत्यल्प व्यवहार नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे नोंदले गेले आहेत.
पुण्यातील वाहन विक्रेत्यांनी यंदा दसऱ्यालाच दिवाळी साजरी झालीय... यावेळच्या दसऱ्याला पुण्यात वाहन विक्रीत तब्ब्ल २५ टक्क्यांनी वाढ झाली. दसऱ्याला पुण्यात आठ हजार सातशे वाहनांची विक्री झालीय. त्यामुळंच यंदाचा दसरा वाहन विक्रेत्यांची दिवाळी करणारा ठरलाय.
वाहन विक्रीतील या वाढीमुळं वाहन उद्योजक आणि विक्रेत्यांनाच दिलासा मिळालाय असं नाही. तर, सरकारच्या तिजोरीत देखील चार कोटींची भर पडलीय. आरटीओ प्रमाणेच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने देखील दसऱ्याच्या दिवशी कार्यालयं सुरु ठेवली होती. मात्र, जमीन किंवा फ्ल्याटच्या खरेदी - विक्रीला दसऱ्याच्या दिवशी फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं चित्र आहे. पुण्यात दसऱ्याला केवळ ५३ व्यवहार नोंदवले गेले आहेत. राज्यातील इतर ठिकाणचे आकडे तर आणखीनच कमी आहेत.
पुण्यात रिअल इस्टेटसह इतर क्षेत्रात मंदी असताना, वाहन विक्रीनं मात्र भरारी घेतल्याचं चित्र आहे. पुण्यातील वाहन विक्रीतील या तेजीमागचं कारण मात्र वेगळं आहे. अपुरी आणि ढिसाळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे वाहन विक्रीत झालेल्या वाढीमागचं मुख्य कारण आहे. टू व्हीलरची सर्वाधिक झालेली विक्री हे त्याचंच प्रतीक आहे आणि नाकर्ते राजकारणी त्यासाठी जबाबदार आहेत.
पीएमपीएल शिवाय पुण्यात दुसरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. पीएमपीएलही कशी बशी सुरु आहे. मेट्रोची तर अजूनही उदघाटनचं सुरु आहेत. त्यामुळं पुणेकर प्रवासासाठी स्वतःच वाहन घेणं पसंत करतायेत. त्यामुळं पर्यावरण , वाहतूक कोंडी हे प्रश्न निर्माण होतायेत. पण त्याची फिकीर करायला कोणी तयार नाही.