अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात  (Purushottam Puttewar Murder Case) दररोज नवनवीन खुलासे होताहेत. सुरुवातीला हिट अँड रन वाटणारं (Hit and Run) हे प्रकरण सुपारी देऊन केलेल्या हत्येपर्यंत पोहोचलं. या हत्येचं बिंग कसं फुटलं, याची धक्कादायक माहिती झी २४ तासला मिळालीय. पुट्टेवारांना गाडीखाली चिरडणारा आरोपी नीरज निमजे उसनवारी करून दारू प्यायचा.. मात्र अचानक तो मित्रांना दारू पार्ट्या देऊ लागला. दारूचे महागडे ब्रँड ऑफर करू लागला. कायम इतरांकडून दारू पिणाऱ्या नीरजच्या दिलदारपणावर काहींना शंका आली. खबऱ्यामार्फत ही माहिती पोलिसांपर्यत पोहोचली आणि पोलीस कामाला लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसं फुटलं हत्येचं बिंग? 
एका अपघात प्रकरणात आरोपी नीरजकडे भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानुसार ज्या अपघातात आरोपी चालक सापडलेला नाही, अशा प्रकरणांची माहिती घेणं पोलिसांनी सुरू केलं. तेव्हा बालाजीनगर भागातील पुरुषोत्तम पुट्टेवार अपघात प्रकरण (Purushottam Puttewar Murder Case) समोर आलं. पोलिसांनी नीरजला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा पुरुषोत्तम पुट्टेवारांचा मृत्यू अपघाती नसून सुनियोजित हत्या असल्याची कबुली नीरजनं दिली


मुख्य आरोपीचा मोबाईल हस्तगत
पोलीस तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येताहेत. अर्चना पुट्टेवारचा मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. अटकेपासूनच अर्चनानं मोबाईल फोन गायब केला होता. मात्र अर्चनाची सहकारी आणि आरोपी पायल नागेश्वरच्या मदतीनं पोलिसांनी मोबाईल मिळवला. त्यामुळं अर्चनाच्या मोबाईलमधून आणखी काही खुलासे होण्याची शक्यताय. अपघाताचा बनाव करून हत्येसाठी अर्चनानं आणखी कुणाची मदत घेतली का..? अजून कुणाच्या हत्येच्या कटात समावेश होता का? याचा तपास पोलीस करत आहेत. त्यातून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


सुनेनीच दिली सुपारी
300 कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनेच तिच्या सासऱ्यांची हत्येची सुपारी दिली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळं आणि कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. 22 मे रोजी नागपुरच्या मानेवाडी परिसरात पुरुषोत्तम पट्टेवार वय 82 वर्षे यांना एका कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सुरुवातीला त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. या घटनेनंतर पट्टेवार यांच्या भावाने पोलिसांकडे मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. पोलिसांनी जेव्हा त्या दिशेने तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक खुलासे समोर आले.


पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून अर्चना पुट्टेवार हिनेच  पैसे देऊन त्यांच्या सासऱ्यांचा अपघात घडवून आणण्यास सांगितले होतं, असा जबाब तिच्या ड्रायव्हरने दिलाय