नवी दिल्ली : शुक्रवारी राहुल गांधी एक दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडला पक्षाचा मेळावा राहुल गांधी घेणार आहेत तर परभणीला शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सगळीकडेच पानिपत झाल्यावर फक्त मराठवाड्यातच काँग्रेसचे दोन खासदार निवडून आले होते. नांदेडहून अशोक चव्हाण, तर हिंगोलीतून राजू सातव... त्यामुळं या प्रभाव असलेल्या भागातच राहुल गांधी दौरा करून काँग्रेसचे प्रभाव अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बोललं जातंय. 


नांदेड महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे तर परभणी महापालिकाही काही दिवसांपूर्वी काँग्रेसन जिंकली आहे. या परिस्थितीत मराठवाड्यावर पकड ठेवण्यासाठी काँग्रेस या भागात आपले संघटन वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार यात शंका नाही.. त्यात नांदेड महापालिका निवडणुकांचीही घोषणा झाली आहे. त्यामुळं प्रचाराचा नारळ राहुल गांधी यांच्या हस्ते फुटणार असं चित्र आहे.


काँग्रेसचा प्रभाव जरी नांदेडमद्ये असला तरी चित्र आता बदलते आहे. अनेक नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहे. त्यामुळं चित्र म्हणावं तसं चांगल नाही, हे मोठं आव्हान काँग्रेससमोर असणार आहे. यातून पक्षाला दिशा देण्याचा प्रयत्न राहुल गांधी करू शकतात. तर परभणीला शेतकरी मेळावा घेऊन राहुल गांधी राज्यातील भाजप सरकारवरही टीका करण्याची शक्यता आहे.


कर्ज माफीनंतरही घातलेल्या जाचक अटीमुळं शेतकरी नाराज आहे आणि याच नाराजीचा फायदा आगामी निवडणुकांत काँग्रेस घेवू इच्छिते. त्यामुळं शेतकऱ्यांसोबत हरवलेली नाळ जोडण्याचा प्रयत्नही राहुल गांधी करू शकतात. त्यामुळं काँग्रेससाठी राहुल गांधीचा हा दौरा फार महत्वाचा असा ठरणार आहे.