`सचिन वाझे महिन्याला मातोश्रीवर 100 कोटी रुपये पाठवायचा`
शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदाराचा गंभीर आरोप
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस आल्यानंतर विरोधक '50 खोके एकदम ओके' म्हणत शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधत आहेत. विधिमंडळातील पावसाळी अधिवेशनावेळी सभागृह या घोषणांनी दणाणून सोडलं होतं. अशातच शिंदे गटातील बुलढाणा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव (Mp Prataprao Jadhav) यांनी शंभर खोके मातोश्री ओके म्हणत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. (Sachin Waze 100 crore rupees to Matoshree every month allegation Mp Prataprao jadhav marathi viral news)
50 खोके एकदम ओके म्हणताना "शंभर खोके मातोश्री ओके" तेही दर महिन्याला जायचे, सचिन वाझे पैसे जमा करून मातोश्रीवर पाठवत होता. त्यातील अनिल देशमुख आणि वाझे कुठे आहेत, असा सवाल प्रतापराव जाधवांनी केला आहे. इतकंच नाहीतर मातोश्रीला दर महिन्याला शंभर खोके जात असल्याचा दावाही जाधव यांनी केला आहे.
राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील (Gulab Raghunath Patil) पहिल्यांदाच बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून दाखल झाले. यावेळी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी मेहकरमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांची शहरातून रॅली काढत जोरदार स्वागत केलं. यावेळी आयोजित 'हिंदू गर्वगर्जना' कार्यक्रमात मात्र शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवरच गंभीर आरोप केले.
दरम्यान, आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना 50 खोके एकदम ओके, म्हणून हिणवलं जायचं. मात्र आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट मातोश्रीलाच "शंभर खोके एकदम ओके" तेही दर महिन्याला म्हणून आव्हान दिलंय. या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापतय का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.