Sanjay Raut on Ajit Pawar NCP Crisis: शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्याच निर्णयाची पुनरावृत्ती मंगळवारी अजित पवार गटासंदर्भात पाहायला मिळाली. निवडणूक आयोगाने पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना धक्का देणारा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचं नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार गटाला सोपवलं आहे. या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हानच दिलं आहे.


शिंदे-पवारांनी पक्षांतर केल्याबद्दल काहीही म्हणणं नाही पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांना अजित पवारांच्या एका जुन्या व्हिडीओवरुन प्रश्न विचारण्यात आला. तुमच्या पक्षाचा निर्णय दिलेला तेव्हा अजित पवारांनी केलेल्या, स्वत:च्या जीवावर का पक्ष काढला नाही? पक्ष हिरावून घेतल्याचं विधान करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, असं म्हणत संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देण्याआधी संजय राऊत हसले. त्यांनी, "हे विंडबन आहे खरं म्हणजे," असं म्हटलं. "अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. पक्षांतर करुन भाजपामध्ये शिरकाव करुन घेतला. मात्र त्यांनी पक्षांवर दावा सांगावा. भाजपाने ते पक्ष त्यांच्या हातात सोपवावेत हा वादाचा मुद्दा आहे," असं संजय राऊत म्हणाले.


नक्की वाचा >> Breaking News: शरद पवारांच्या पक्षाचं नाव ठरलं! पक्षचिन्हही झालं निश्चित


चोऱ्यामाऱ्या, दरोडेखोरी, लपंगेगिरी करुन...


संजय राऊत यांनी शिंदे आणि अजित पवार यांना आव्हान देताना, "तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही स्वत:चे पक्ष स्थापन करा आणि लोकांसमोर जा आणि सांगा की हा माझा पक्ष आहे, मला मत द्या! तुम्ही अशा चोऱ्यामाऱ्या, दरोडेखोरी, लपंगेगिरी करुन राजकारण करणार असाल तर हे तात्पुरतं राजकारण आहे," असं मत नोंदवलं.


नक्की वाचा >> ..म्हणून मोदी-शाहांनी राष्ट्रवादी अजित पवारांना दिली; संजय राऊतांचा दावा


भाजपालाही दिला सूचक इशारा


"एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं अभिनंदन भाजपाचे लोक त्यांना पक्ष मिळाल्याबद्दल करत आहेत. पण लक्षात घ्या उद्या तुमचाही पक्ष हातातून जाऊ शकतो. आज मोदी-शाहांची गॅरंटी ही तत्पुरती गॅरंटी आहे. उद्याचा काळ अत्यंत भयंकर आहे आणि भाजपाला याचे परिणाम भोगावे लागतील," असा सूचक इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.