गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका (APMC Election Results) पार पडल्यानंतर आता निकाल हाती आले आहेत. राज्यात एकूण 253 बाजार समित्याअसून त्यातील 18 बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर उर्वरीत 235 बाजार समित्यांपैकी 147 बाजार समित्यांची शुक्रवारी निवडणूक झाली आहे. शनिवारी या निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांचा अनेक ठिकाणी पराभव झाला असून महाविकास आघाडीने (MVA) जोरदार मुसंडी मारली आहे. प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना उत्साह पाहायला मिळाला आहे. मात्र परभणीत (Parbhani News) मतमोजणीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ हाणामारी झाल्याचे पाहायला मिळालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणीच्या गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी दरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेल्याचे समोर आले आहे. यावेळी काही काळ मतमोजनीच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे हा संघर्ष निवळला. मात्र मात्र हा प्रकार घडल्यानंतर रासपचे आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांच्यात गुप्तगु झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.


गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांची मतमोजणी शनिवारी पार पडली. याचवेळी एका उमेदवाराने आक्षेप घेतल्याने मतमोजणीत गोंधळ उडाला होता. त्यातच सोसायटी मतदारसंघांमध्ये एका उमेदवाराच्या मतांची बेरीज लावणे बाकी होते. अशातच गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आणि माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांची मतमोजणी केंद्रामध्ये एन्ट्री झाली. त्यानंतर कार्यकर्ते मी बघतो असे म्हणून एकमेकांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेले. 


दुसरीकडे, हा सर्व प्रकार घडल्यानंतर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना बाजूला नेले. त्यानंतर या ठिकाणी दोघांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या. हा सर्व प्रकार पाहून मतदान केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यां मात्र भुवया उंचावल्या आहेत.



रत्नाकर गुट्टे यांना मोठा धक्का


दरम्पयान, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 18 पैकी 11 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार वियजी झाले आहेत. तर रत्नाकर गुट्टे यांच्या गटाने 7 जांगावर विजय मिळवला आहे.