अयोध्येतील भूमिपूजनाला येऊ इच्छिणाऱ्या लाखो रामभक्तांचे काय? उद्धव ठाकरेंचा सवाल
कोरोनाच्या संकटकाळात राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आयोजित केल्याबद्दल अनेकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे
मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे सर्व मंदिरांमध्ये येण्या-जाण्याला बंदी आहे. मग ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या रामभक्तांच्या भावनांचे काय?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी 'सामना' दैनिकाला दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीचा दुसरा भाग रविवारी प्रसिद्ध झाला.
सरकार तीनचाकी असलं तरी एकाच दिशेने चालतंय- उद्धव ठाकरे
यामध्ये उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटकाळात होऊ घातलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावर एकप्रकारे प्रश्चचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, मी अयोध्येला जाऊन येईन, पण लाखो रामभक्त जे उपस्थित राहू इच्छित असतील , त्यांचं तुम्ही काय करणार? त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार? त्यांच्या कळत-नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का?, असे अनेक सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
'फडणवीसांना अमित शाह म्हणजे आदेश बांदेकर वाटले असतील'
कोरोनाच्या संकटकाळात राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आयोजित केल्याबद्दल अनेकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे वक्तव्यही सूचक मानले जात आहे. परंतु, राम मंदिराविषयी आपली पहिली भूमिका अजूनही कायम असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. राम मंदिराशी मी भावनेने बांधलेलो आहे. मुख्यमंत्री असतानाही आणि नसतानाही मी अयोध्येला जाऊन आलो. तसेच रामभक्तांना अयोध्येतील भूमिपूजन सोहळा 'याचि देहि' याचि डोळा' पाहता यावा यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई- भूमिपूजन करा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.